ठाण्यात राष्ट्रवादीला खिंडार? १५-१६ माजी नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करण्याच्या तयारीत | thane former corporators of NCP in Thane likely left party preparing for entry into Balasaheb ShivSena | Loksatta

ठाण्यात राष्ट्रवादीला खिंडार? १५-१६ माजी नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करण्याच्या तयारीत

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील १५ ते १६ माजी नगरसेवक पक्षाला सोडचिठ्ठी देऊन त्यापैकी ठाणे आणि कळवा भागातील पाच माजी नगरसेवक थेट बाळासाहेबांची शिवसेना गटात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.

corporators NCP Balasaheb ShivSena thane
ठाण्यात राष्ट्रवादीला खिंडार? १५-१६ माजी नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करण्याच्या तयारीत (लोकसत्ता ग्राफिक्स)

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील १५ ते १६ माजी नगरसेवक पक्षाला सोडचिठ्ठी देऊन त्यापैकी ठाणे आणि कळवा भागातील पाच माजी नगरसेवक थेट बाळासाहेबांची शिवसेना गटात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. तर, मुंंब्रा भागातील माजी नगरसेवक विकास आघाडी करून त्यामाध्यमातून निवडणूक लढविणार असल्याचे बोलले जात आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांना शह देण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेनाकडून ही खेळी खेळली जात असल्याची चर्चा असून यामुळे राष्ट्रवादीत मोठी फुट पडण्याची शक्यता दिसून येत आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील कळवा-मुंब्रा या परिसरातून राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगरसेवक निवडून येतात. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हे सुद्धा याच भागातून निवडून येतात. त्यामुळे हा परिसर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. राज्यातील सत्ताबदलानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार जितेंद्र आव्हाड हे एकमेकांवर कुरघोडी करताना दिसत आहेत. यातूनच आव्हाड यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांना गळा लावून त्यांना पक्ष प्रवेश देण्याची व्युहरचना बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून आखली जात असल्याचे बोलले जात आहे. बाळासाहेबांची शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांच्या बैठका सुरू असून त्यात पक्षप्रवेशाबाबत बोलणी सुरू असल्याची चर्चा आहे. असे असतानाच, आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जितेंद्र आव्हाड यांनी समाजमाध्यमांवर एक संदेश प्रसारित करत पक्ष फोडाफोडीबाबत भाष्य केले होते. पैसेवाल्या शिवसेनेच्या नेत्यांकडून कळवा-मुंब्र्यामधील नगरसेवकांना खुलेआम तुला एक कोटी देतो, तुझ्या पत्नीला एक कोटी देतो, अशाप्रकारे आमिष दाखविणे सुरू झाले आहे. तसेच नगरसेवक असेल तर तुला तिकीट देतो आणि आता तुला १० कोटी रुपयांची कामे देतो. ही आहे राष्ट्रवादी फोडण्याची पद्धत, असा आरोप आव्हाड यांनी समाजमाध्यमांद्वारे केला होता. तसेच कळव्यातील नगरसेवक जितेंद्र पाटील यांना वेगवेगळी आमिष दाखवून पैसेवाल्यांच्या सेनेत घेण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यासाठी बटलू गद्दार हा प्रामाणिक‘ प्रयत्न करतोय, अशी टिकाही त्यांनी केली होती. या आरोपांमुळे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना फोडण्याचा प्रयत्न होत असल्याच्या चर्चेला एकप्रकारे दुजोरा मिळत आहे.

हेही वाचा – डोंबिवलीत बेकायदा इमारती बांधणाऱ्या ११ भूमाफियांवर फौजदारी गुन्हे; ह, फ प्रभागाची आक्रमक कारवाई

हेही वाचा – नाशिकमधील ३२ वर्षांच्या महिलेकडून कल्याणच्या अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण

मुंब्य्रातील राष्ट्रवादीचे काही नगरसेवक बंडाची तयारी करीत असून, त्यांना शिंदे गटाचा पाठींबा असल्याची चर्चा आहे. हे नगरसेवक मुंब्रा विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे निष्ठावंत मानले जाणारे लोकमान्यनगर भागातील पक्षाचे प्रभावी नेते हणमंत जगदाळे यांच्यासह तीन नगरसेवकांचा शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश निश्चित मानला जात आहे. त्याचबरोबर, कळवा भागातील राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांना गळा लावून पक्षप्रवेश देण्याची तयारी बाळासाहेबांची शिवसेनेकडून सुरू असल्याचे समजते. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला हे सुद्धा नेमकी काय भुमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 15:35 IST
Next Story
नाशिकमधील ३२ वर्षांच्या महिलेकडून कल्याणच्या अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण