डोंबिवली : वाढदिवसासाठी सोमवारी संध्याकाळी घरातून बाहेर पडलेल्या डोंबिवली पश्चिमेतील जुनी डोंबिवलीतील एका १६ वर्षाच्या मुलीचे अज्ञाताने अपहरण केले असल्याची तक्रार या मुलीच्या आईने विष्णुनगर पोलीस ठाण्यात केली आहे. मुळ सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील असलेले हे कुटुंब नोकरीनिमित्त डोंबिवलीत राहत आहे. सोमवारी संध्याकाळी साडे सहा ते सात वाजण्याच्या दरम्यान हा अपहरणाचा प्रकार घडला आहे.

पोलिसांनी सांगितले, अपहृत मुलीच्या मैत्रिणीचा सोमवारी वाढदिवस होता. सोमवारी संध्याकाळी मैत्रिणीने वाढदिवसानिमित्त घरी मेजवानी ठेवली होती. या कार्यक्रमासाठी अपहृत मुलगी जुनी डोंबिवलीतील भारत माता शाळेजवळील आपल्या घरातून संध्याकाळी साडे सहा वाजता निघाली. वाढदिवस असलेली तिची मैत्रिण सम्राट चौकात राहते. मुलगी वाढदिवस कार्यक्रमासाठी गेली आहे म्हणून अपहृत मुलीचे आई, वडील निश्चिंत होते.

हेही वाचा…दीड लाखाहून अधिकची रक्कम असलेली डोंबिवलीतील प्रवाशाची लोकलमध्ये विसरलेली पिशवी परत

रात्रीचे दहा वाजून गेले तरी मुलगी घरी येत नाही म्हणून अपहृत मुलीच्या आईने वाढदिवस असलेल्या मैत्रिणीला संपर्क केला. तेव्हा तिने तुमची मुलगी वाढदिवसासाठी आली नसल्याचे सांगितले. हे बोलणे ऐकून अपहृत मुलीच्या आई, वडिलांना धक्का बसला. त्यांनी मुलगी संध्याकाळी साडे सहा वाजता घरातून बाहेर पडली आहे, असे सांगितले.

अपहृत मुलीच्या आई, वडील, वाढदिवस असलेल्या मैत्रिणीच्या कुटुंबीयांनी अपहृत मुलीचा डोंबिवली परिसरात तात्काळ शोध सुरू केला. ती उद्यान, बगिचा कोठे किंवा रेल्वे स्थानक भागातही आढळून आली नाही. त्यामुळे कोणीतरी अज्ञात इसमाने फूस लावून आपल्या मुलीस पळून नेले असावे म्हणून अपहृत मुलीच्या आईने विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.+

हेही वाचा…डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळील कोंडीने प्रवासी हैराण

विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार यांनी या अपहरण प्रकरणी तपास पथके तयार करून मुलीचा शोध सुरू केला आहे. जुनी डोंबिवली भागातील सीसीटीव्ही चित्रण तपासून, तांत्रिक माहितीच्या आधारे पोलीस अपहृत मुलीचा शोध घेत आहेत.