ठाणे : महापालिका क्षेत्रात वृक्ष उन्मळून पडण्याबरोबरच फांद्या पडण्याचे सत्र सुरूच असून गेल्या चोवीस तासात शहरात १९ वृक्ष उन्मळून पडले तर, ६ ठिकाणी झाडाच्या फांद्या पडल्या. याशिवाय ५ वृक्ष धोकादायक स्थितीत असल्याच्या तक्रारी पालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झाल्या आहेत. या घटनांमध्ये कुणीही जखमी झालेले नसले तरी वाहनांचे नुकसान झाले आहे. यामुळे शहरातील धोकादायक वृक्षांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचे चित्र आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे शहरात यापूर्वी पावसाळ्यात धोकादायक वृक्ष पडून नागरिकांना आपला जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा घटना टाळण्यासाठी पालिकेने शहरातील वृक्षांची पाहणी करून १०६ वृक्ष धोकादायक म्हणून घोषित केले होते. हे सर्व वृक्ष पालिकेने काढून टाकले होते. त्यानंतरही मुसळधार पावसादरम्यान शहरात वृक्ष उन्मळून पडण्याबरोबरच फांद्या पडण्याचे सत्र सुरूच असल्याचे दिसून येते. गेल्या चोवीस तासात १९ वृक्ष पडली तर ६ ठिकाणी फांद्या पडल्या. तर ५ वृक्ष धोकादायक असल्याच्या तक्रारी पालिकेकडे प्राप्त झाल्या आहेत. रस्त्यालगतचे वृक्ष उन्मळून पडण्याचे किंवा फांद्या पडण्याच्या घटना सर्वाधिक आहेत. रस्त्यावर नागरिकांची आणि वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे अशा घटना नागरिकांच्या जीवावर बेतण्याची भिती व्यक्त होत आहे.

ठाणे शहरात सलग तिसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारीही पावसाचा जोर कायम असून शहरात वृक्ष उन्मळून पडण्याबरोबरच एक ठिकाणी दरड कोसळलयाची घटना घडली आहे. तसेच एक इमारत धोकादायक असल्याची तर तीन ठिकाणी पाणी साठण्याच्या तक्रारी पालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झाल्या आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 19 trees uprooted last 24 hours municipal corporation field complaints ysh
First published on: 06-07-2022 at 10:53 IST