ठाणे : घोडबंदर येथील मानपाडा परिसरातील ठाणे महापालिकेच्या भाडेतत्वावरील योजनेमधील इमारतीत महिनाभरापुर्वी झालेल्या वृद्ध दाम्पत्याच्या हत्येप्रकरणातील दोन आरोपींना चितळसर पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांना ठाणे न्यायालयाने २० फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असून या दोघांनी चोरीच्या उद्देशातून ही हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. निसार अहमद कुतबुद्दीन शेख (२७) आणि रोहित सुरेश उत्तेकर (२६) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> चोर असल्याच्या संशयावरून जमावाने केलेल्या मारहाणीत दोघांचा मृत्यू, अंबरनाथ शहरातील प्रकार, गुन्हा दाखल

हे दोघे मानपाडा येथील ठाणे महापालिकेच्या भाडेतत्वावरील योजनेमधील दोस्ती एम्पेरिया या इमारतीत राहतात. निसार हा सुरक्षारक्षकाचे तर, रोहित हा कळवा येथील महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात वाॅर्डबाॅयचे काम करतो. या दोघांनी त्यांच्याच इमारतीत १४ व्या मजल्यावरील एका सदनिकेत राहणाऱ्या समशेर बहादूर सिंह (६८) आणि मिना समशेर सिंह (६५) या दाम्पत्याची हत्या केल्याचे तपासात उघड झाले आहे. निसार आणि रोहित या दोघांनी सदनिका क्रमांक १६२५ च्या बाथरुमच्या खिडकीतून उतरून १४ व्या मजल्यावरील समशेर सिंह यांच्या घरातील बाथरुममध्ये प्रवेश केला. यानंतर दोघांनी समशेर आणि त्यांची पत्नी मिना यांची गळा दाबून हत्या केली आणि घरातील मोबाईल, सोन्याचे दागिने चोरी करून तेथून पळ काढला. संशयित म्हणून दोघांकडे चौकशी केली असता, त्यांनी हत्येची कबुली दिली. रोहित आणि निसार या दोघांकडून चोरीस गेलेला मोबाईल आणि सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत, अशी माहिती पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 2 youth arrested for killing elderly couple in thane zws
First published on: 17-02-2024 at 22:25 IST