ठाणे – स्वच्छता, वाहतूक नियमांचे पालन, प्रदूषणमुक्त वातावरण, रोजगारनिर्मिती तसेच सरकारी सुविधांची उपलब्धता याविषयांवर विशेष भर यंदाच्या स्वागत यात्रेत दिला जाणार आहे. हिंदू नववर्षानिमित्त ठाण्यातून निघणाऱ्या स्वागत यात्रेची ठाणेकर नागरिक आतुरतेने वाट पाहतात. त्यानुसार, स्वागत यात्रेची तयारी सुरु झाली असून यंदाची स्वागत यात्रा ‘समर्थ ठाणे – सशक्त भारत’ असणार आहे, अशी माहिती श्रीकौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाकडून देण्यात आली.

श्रीकौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास आयोजित हिंदू नववर्षे स्वागत यात्रेचे यंदाचे २६ वे वर्षे आहे. यंदा १९ मार्च गुढीपाडव्याच्या दिवशी दरवर्षीप्रमाणे स्वागत यात्रा निघणार आहे. यासाठी न्यासाकडून दीड महिन्याआधीपासून स्वागत यात्रेची तयारी सुरु झाली आहे. दरवर्षी वेगवेगळी संकल्पना घेऊन ही स्वागत यात्रा निघत असते. ठाणेकर नागरिक या यात्रेत उत्साहाने सहभागी होत असतात. यंदाही स्वागत यात्रेसाठी ‘वंदे मातरम्चे १५० वर्ष’, ‘समर्थ ठाणे – सशक्त भारत’ आणि ‘भारत २०४७’ या तीन संकल्पना निश्चित करण्यात आली असल्याची माहिती न्यासाकडून देण्यात आली आहे. परंतू, यामध्ये ‘समर्थ ठाणे – सशक्त भारत’ या विषयावर स्वागत यात्रेचा सर्वाधिक भर असणार असल्याचे पाहायला मिळत आहे.

काय आहेत यंदाच्या संकल्पना ? ‘वंदे मातरम्’ या गीताला १५० वर्षे पूर्ण होत असल्याने संपूर्ण देशभरात त्याचे औचित्य साधून विविध उपक्रम राबवले जात आहेत. देशभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी हा विषय ठरवण्यात आला आहे. तर, ‘भारत २०४७’ मध्ये भारताच्या स्वातंत्र्याला १०० वर्षे पूर्ण होणार असून विकसित भारताच्या संकल्पनेवर देशभरात काम सुरू आहे. त्या अनुषंगाने ‘भारत २०४७’ ही संकल्पना स्वागत यात्रेतून अधोरेखित केली जाणार आहे. समर्थ ठाणे – सशक्त भारत संकल्पना काय ?

‘समर्थ ठाणे – सशक्त भारत’ या संकल्पनेतून शहराच्या विकासावर भर देण्यात येणार आहे. स्वच्छता, वाहतूक नियमांचे पालन, प्रदूषणमुक्त वातावरण, रोजगारनिर्मिती तसेच सरकारी सुविधा सक्षमपणे उपलब्ध झाल्यास शहर समर्थ बनेल आणि त्यातून देश सशक्त होईल, असे आयोजकांनी स्पष्ट केले. या संदर्भातील अधिकृत घोषणा सोमवारी झालेल्या न्यासाच्या बैठकीत करण्यात आली. या बैठकीला ठाणे शहरातील १४ विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सर्व संस्थांनी या उपक्रमासाठी सहकार्य करण्याची भूमिका दर्शवली.

यंदाचे स्वागताध्यक्ष दरवर्षी स्वागत यात्रेसाठी एका स्वागताध्यक्षकांची नेमणूक केली जाते. सांस्कृतिक, सामाजिक, शेैक्षणिक, विज्ञान अशा विविध क्षेत्रातील आतापर्यंत स्वागताध्यक्ष होऊन गेले आहेत. त्यानुसार यंदा विदुषी निरूपणकार धनश्री लेले यांची स्वागताध्यक्षपदी नेमणुक करण्यात आली आहे.