scorecardresearch

ठाणे : ‘इतरांनाही पैसे गुंतवायला सांगा अन् नफा मिळवा’ योजनेच्या नावाने २१ जणांना ४४ लाखांचा गंडा

भागभांडवल बाजारात आणि परकीय चलनात गुंतवणूक केल्यास ज्यादा परतावा मिळेल असे सांगून २१ जणांची तब्बल ४४ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

ठाणे : ‘इतरांनाही पैसे गुंतवायला सांगा अन् नफा मिळवा’ योजनेच्या नावाने २१ जणांना ४४ लाखांचा गंडा
प्रतिनिधिक छायाचित्र

भागभांडवल बाजारात आणि परकीय चलनात गुंतवणूक केल्यास ज्यादा परतावा मिळेल असे सांगून २१ जणांची तब्बल ४४ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी फसवणूक करणाऱ्या सात जणांविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आहे. तर या गुन्ह्याचा पुढील तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरु असून आतापर्यंत पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांना अटक केली आहे. तर दोघांचा शोध सुरु असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा >>>प्रेम प्रकरणाच्या रागातून टिटवाळ्यात महिलेवर मुले चोरीचा आरोप ; पीडितेला बेदम मारहाण

ठाणे येथील हरिनिवास भागात जी.बी. आय.ट्रेड नामे भागभांडवल बाजारात आणि परकीय चलनात गुंतवणूक करणारी एक कंपनी आहे. मनोज रॉय, किरण सावंत, संतोषकुमार चौबे, राजेंद्र सावंत, सचिन चव्हाण, प्रवीण घोले आणि मनोज गुंजाळकर हे सात जण मिळवून ही कंपनी चालवत होते. या कंपनीच्या द्वारे भागभांडवल बाजारात आणि परकीय चलनात विविध योजनांतून गुंतवणूक केल्यास पाच टक्के दोनशे टक्के परतावा मिळेल. तसेच एका गुतंवणूकदाराने इतरही कोणाला कंपनीत गुंतवणूक करण्यास तयार केले तर एक ठरविक रक्कम ही संबंधित गुंतवणूक दाराला देण्यात येईल. असे या सातही जणांकडून नागरिकंना सांगण्यात येत असे. जादा परताव्याच्या अमिषाला बळी पडून मागील वर्षी डोंबिवली मधील काही नागरिकांनी यात काही लाख रुपयांची गुतंवणूक केली. सुरुवातीचे काही महिने कंपनीतर्फे गुंतवणूकदारांना प्रतिमहिना जादा परतावा देण्यात आला. यामुळे त्या गुंतवणूक दारांनी इतरांनाही कंपनीत गुंतवणूक करण्यास सांगितले/ त्यांच्या सांगण्यानुसार उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, कुर्ला, डोंबिवली, भिवंडी, ठाणे येथील २१ गुंतवणूकदारांनी जी.बी. आय.ट्रेड कंपनीत मागील वर्षी ४४ लाख ४० हजार रुपयांची गुंतवणूक केली.

हेही वाचा >>> भिवंडीत उद्या वाहक बदल ; ईद-ए-मिलाद निमित्त निघणाऱ्या मिरवणुकीमुळे वाहतुकीत बदल

मात्र मागील सात महिन्यांपासून सर्व गुंतवणूकदारांना कोणत्याही प्रकारचा परतावा मिळाला नाही. तसेच कंपनीतील सात ही जणांशी कोणताच संपर्क होत नसल्याने डोंबिवली येथील एका गुंतवणूकदाराने नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे सातही जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल आला असून या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून करण्यात येत आहे. गुन्हे अन्वेषण शाखेकडून आतापर्यंत यातील पाच जणांना अटक करण्यात आली असून फरार असलेले मनोज रॉय आणि संतोषकुमार चौबे यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. तसेच यात अनेकांची फसवणूक झाल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात आली आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-10-2022 at 18:47 IST

संबंधित बातम्या