ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाचा कायापालट ; २१३ कोटींच्या सुधारित खर्चाला मंजुरी

सोमवारी झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन या सुधारित रकमेला मान्यता मिळाली आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

मुंबई : ठाणे येथील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयाचे (सिव्हिल रुग्णालय) रूपांतर मल्टी स्पेशालिटी रुग्णालयात करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. राज्य शासनाच्या उच्चाधिकार समितीने मल्टी स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यासाठी २१३ कोटींच्या सुधारित खर्चाला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आधीचे ३१४ आणि आताचे २१३ असा ५२७ कोटींचा निधी मंजूर झाल्याने या रुग्णालयाचे काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ठाणे जिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून तिथे मल्टी स्पेशालिटी रुग्णालय उभारण्याची आग्रही मागणी राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. या मागणीचा सातत्यपूर्ण पाठपुरावा करून अखेर या रुग्णालयाच्या उभारणीसाठी निधी मिळवण्यात यश आले आहे.

ठाण्यातील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयाचे मल्टी स्पेशालिटी रुग्णालयात रूपांतर करण्याच्या मागणीला आरोग्य विभागाने मंजुरी दिली होती. तसेच या ठिकाणी अद्ययावत रुग्णालयात उभारण्यासाठी ३१४ कोटींचा निधी मंजूर केला होता. मात्र त्यानंतर या जागी मल्टी स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यासाठी अतिरिक्त २१३ कोटी रुपयांची गरज होती. सोमवारी झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन या सुधारित रकमेला मान्यता मिळाली आहे.

रुग्णालय कसे असेल?

* या मल्टी स्पेशालिटी रुग्णालयात ९०० रुग्णशय्या असतील.

* २०० रुग्णशय्या गर्भवती महिलांसाठी, २०० सुपर स्पेशालिटी तर उर्वरित ५०० रुग्णशय्या या सर्वसाधारण असणार आहेत.

* प्रत्येक विभागात दोन स्वतंत्र अतिदक्षता विभाग उभारण्यात येणार आहेत.

* या रुग्णालयाची क्षमता तिप्पट होणार असून तिथे कर्करोग, मेंदूशी संबंधित आजार, श्वसनाशी संबंधित आजार तसेच हृदयरोगावर उपचार घेणे शक्य होणार आहे.

* रुग्णांना एअर लिफ्ट करून आणण्यासाठी हेलिपॅडची सुविधा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 213 crore fund for transformation of thane district government hospital zws

ताज्या बातम्या