ठाणे ते बदलापूपर्यंतच्या शहरांतील वाहतूक कोंडी भेदण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी हाती घेतलेल्या ‘एक चौक..एक समस्या’ या उपक्रमामध्ये २२ ठिकाणांची निवड करण्यात आली असून या ठिकाणी वाहतूक नियोजनासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. या अंतर्गत या चौकांचा आकार लहान करणे, फेरीवाले तसेच अतिक्रमणे हटवणे, ‘नो पार्किंग’ क्षेत्र जाहीर करणे, दुभाजक बसवणे, वाहतुकीस अडथळा ठरणारे बसथांबे स्थलांतरित करणे असे उपाय राबवण्यात येणार आहेत. हा नवा आराखडा प्रत्यक्षात उतरवून वाहतूक कोंडीमुक्त शहरे करण्यासाठी वाहतूक शाखेने संबंधित महापालिका आणि नगरपालिकांकडे पाठपुरावा सुरू केला आहे. ठाणे ते बदलापूपर्यंतची शहरे वाहतूक कोंडीतून मुक्त करण्यासाठी जुलै महिन्यापासून ठाणे वाहतूक पोलिसांनी ‘एक चौक, एक समस्या’ हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाअंतर्गत ठाणे वाहतूक शाखेच्या २३ युनिटवर प्रत्येकी एका चौकाची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. या चौकांमध्ये वाहतूक कोंडी का होते, या जोडणारे रस्ते कुठे जातात, ही कोंडी कशी सोडवता येईल या गोष्टींचा विचार करून पोलिसांनी एक सविस्तर अहवाल तयार केला आहे. त्यामध्ये चौकांचा आकार लहान करणे, फेरीवाले तसेच अतिक्रमण हटविणे, नो पार्किंग क्षेत्र घोषित करणे, दुभाजक बसविणे आणि वाहतुकीस अडथळे निर्माण होऊ नये म्हणून बसथांबे कुठे असावेत, आदी कामांचा समावेश आहे. मात्र, ही सर्व कामे महापालिका आणि नगरपालिकांच्या अखत्यारीत येत असल्यामुळे वाहतूक शाखेने त्यासाठी संबंधित महापालिका आणि नगरपालिकांकडे पत्राद्वारे पाठपुरावा सुरू केला आहे.

सूचक नाक्याची कोंडी फुटली
कल्याण पूर्वेतील सूचन नाक्याचा परीघ मोठा असल्याने मोठय़ा वाहनांना वळण घेणे शक्य होत नव्हते. परिणामी, या भागातील मार्गावर वाहतूक कोंडी व्हायची. त्यामुळे ‘एक चौक..एक समस्या’ या उपक्रमामध्ये कोळसेवाडी युनिटचे सहायक पोलीस निरीक्षक हर्षद गालिंदे यांनी महापालिका तसेच महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडे पाठपुरावा करून चौकाचे परीघ छोटे केले. या भागात उभे रहाणाऱ्या बस, रिक्षा, टेम्पोचे थांबे दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात आले. याशिवाय, या चौक परिसरात कचराकुंडी होती. ती काढून दुसऱ्या ठिकाणी ठेवण्यात आली. त्यामुळे सूचक चौकातील वाहतूक आता काहीशी सुरळीत झाल्याचा दावा वाहतूक शाखेने केला आहे.
निवड केलेली ठिकाणे
* ठाणे : दादा पाटील वाडी परिसर, गावदेवी चौक ते आंबेडकर चौकापर्यंत मार्ग, तीन हात नाक्याजवळील सेवा रस्ते, नितीन जंक्शनकडून अल्मेडा चौकात जाणारा मार्ग व सेवा रस्त्यावरून काजुवाडीकडे जाणारा मार्ग, कामगार हॉस्पिटल ते यशोधननगपर्यंत मार्ग, गोल्डनडाईज नाका, कासारवडवली जंक्शन, कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, जी.पी.ओ ते जेल रोड मार्ग, मुंब्य्रातील कल्याण फाटा.

* कल्याण : शिवाजी चौक, बिर्ला कॉलेजसमोरील चौक, कोळसेवाडीतील सूचक नाका, विठ्ठलवाडीमधील श्रीराम चौक.
* डोंबिवली : लोढा चौक, कोपर ब्रिज येथील टी जंक्शन
* भिवंडी : रांजनोली चौक, स्व. आनंद दिघे चौक, अंजुरफाटा ते मानकोलीपर्यंतचा रस्ता
* उल्हासनगर : नेहरू चौक
* अंबरनाथ : गांधी चौक