scorecardresearch

स्टिरॉईडमुळे २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू, बॉडी कमावण्याच्या नादात गमावला जीव

बॉडीबिल्डर होण्याची इच्छा असलेल्या २३ वर्षीय तरुणाचा स्टिरॉईडचे अतिसेवन केल्याने मृत्यू झाला आहे

चांगली शरीरयष्टी कमावण्यासाठी अनेक तरुण आजकाल स्टिरॉईडचे सेवन करतात. पण असं करणं ठाण्यातील एका तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. बॉडीबिल्डर होण्याची इच्छा असलेल्या २३ वर्षीय तरुणाचा स्टिरॉईडचे अतिसेवन केल्याने मृत्यू झाला आहे. नावेद जमील खान असं या तरुणाचं नाव असून तो मुंब्रा येथे वास्तव्यास होता. ठाणे शहरातील शरीरसौष्ठव स्पर्धेत सहभागी होणार होता त्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला.

नावेदला शुक्रवारी रात्री ताप आला होता. यानंतर त्याच्या कुटुंबाने त्याला स्थानिक डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टरांनी काही चाचण्या केल्यानंतर कुटुंबीयांना नजीकच्या बिलाल रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. रुग्णालयामध्ये डॉक्टरांनी केलेल्या चाचण्यांमधूनही धक्कादायक माहिती समोर आली. नावेदला हिपॅटायटीस बी हा आजार होता हे निष्पन्न झालं. तसेच खानच्या शरिरामधील कोलेस्ट्रॉलचे प्रमाणही अधिक असल्याचे समजले. व्यायाम करण्याची क्षमता वाढवण्यासाठी घेण्यात येणाऱ्या औषधांमधील ग्लुकोकॉट्रीकॉइड्स या संप्रेरकांमुळं शरिरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढल्याचे डॉक्टरांनी सांगितलं.

नावेदची त्वचा पिवळी पडू लागली. त्याच्या पोटात काहीच राहत नव्हतं. यानंतर डॉक्टरांना त्याला आयसीयूमध्ये ठेवण्यास तसंच यकृत प्रत्यारोपण करण्याची गरज असल्याचं सांगत पैशांची व्यवस्था करण्यासाठी सांगण्यात आलं. कुटुंबाने नावेदला केईएम रुग्णालयात आणलं. पण तोपर्यंत त्याची प्रकृती खूपच खालावली होती. फुफ्फुस खराब झाल्याने त्याला श्वास घेण्यासही त्रास होत होता. अखेर रविवारी त्याचा मृत्यू झाला अशी माहिती कुटुंबाने दिली आहे.

“नावेदच्या कुटुंबाच्या नावे काही संपत्ती असून ते भाड्याने राहतात. नावेदला जीम ट्रेनर होण्याची इच्छा होती. ठाणे जीममध्ये एक स्पर्धा होणार होती. ती स्पर्धा तो जिंकला असता तर त्याला ट्रेनरच्या जागेची ऑफर मिळाली असती,” असं नावेदच्या एका नातेवाईकाने सांगितलं आहे. नावेद ऑनलाइन स्टिरॉईड मागवायचा अशी माहिती त्याच्या आईने दिली आहे. त्यांनी तरुणांना स्टिरॉईडपासून दूर राहण्याचं आवाहन केलं आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 23 year old bodybuilder dies due to liver damage after taking steroids in thane sgy

ताज्या बातम्या