पावसाळ्या पूर्वी कल्याण-डोंबिवली पालिका प्रशासनाने शहरातील धोकादायक इमारतींच्या घेतलेल्या सर्व्हेक्षणात १० प्रभागांच्या हद्दीत एकूण २३५ अतिधोकादायक इमारती आढळून आल्या आहेत. या इमारती सुमारे ३५ ते ४० वर्षापूर्वी बांधण्यात आल्या आहेत. यामधील अनेक इमारती रिकाम्या तर काही इमारतींमध्ये अधिकाऱ्यांना रहिवास आढळून आला आहे.

३० वर्षापूर्वी नगरपालिका प्रशासन काळात कल्याण, डोंबिवली पालिका हद्दीत आरसीसी पध्दतीच्या पालिकेच्या परवानग्या न घेता बेकायदा इमारती बांधण्यात आल्या. या इमारतींमध्ये यापूर्वी दोन ते तीन लाख रूपयांना रहिवाशांनी सदनिका खरेदी केली. धोकादायक इमारती असलेल्या जागांचे मोल आता वाढल्याने जुने रहिवासी घर खाली करण्यास तयार नाही. अनेक रहिवासी या घरांमध्ये भाड्याने राहतात. जुन्या पध्दतीचे भाडे ५० ते १०० रूपये आहे. हे भाडे परवडत नाही म्हणून इमारत, जमीन मालक या इमारतींची देखभाल, डागडुजी करत नाही. या धोकादायक इमारतींमधील रहिवाशांनी योग्य मोबदला घेऊन अन्यत्र घर घ्यावे किंवा धोकादायक इमारतीचा पुनर्विकास होत असेल तर विकासक सांगेल त्याप्रमाणे अतिरिक्तची रक्कम भरणा करून या पुनर्विकास प्रकल्पात सदनिका खरेदी करावी, असे इमारत मालक भाडेकरूंना सांगत आहेत.

अनेक भाडेकरू मालकाच्या प्रस्तावाला मान्यता देत नाहीत. या इमारतींमध्ये आम्हाला आहे त्या क्षेत्रफळाप्रमाणे घर द्यावे, अशी भाडेकरूंची मागणी असल्याने घर मालक धोकादायक इमारतींचा पुनर्विकास करण्यास धजावत नाहीत, असे डोंबिवलीतील काही विकसाकांनी सांगितले. जुन्या इमारत पुनर्विकास प्रकरणावरून मालक, भाडेकरू वाद न्यायालयात गेले आहेत. त्यामुळे इमारतींचा पुनर्विकास रखडला आहे, असे काही जमीन मालकांनी सांगितले.

प्रभागनिहाय धोकादायक इमारत संख्या –

गेल्या आठवड्यात डोंबिवली पश्चिमेत ह प्रभाग अधिकाऱ्यांनी एक इमारत धोकादायक जाहीर केली. गेल्या २० वर्षात पालिकेने २३४ इमारती धोकादायक म्हणून जाहीर केल्या आहेत. दरवर्षी मे मध्ये पावसाळ्यातील धोका टाळण्यासाठी या इमारतींमधील रहिवाशांना इमारत खाली करण्यासाठी पालिकेकडून नोटिसा दिल्या जातात, असे पालिका अधिकाऱ्याने सांगितले. सर्वाधिक धोकादायक इमारती कल्याण पश्चिमेतील क प्रभागात आहेत. या प्रभागात ९४ धोकादायक इमारती आहेत. डोंबिवलीतील फ प्रभागात ३२, पश्चिमेतील ह प्रभागात ३९, ग प्रभागात २१, ई प्रभागात १८, अ प्रभाग एक, ब प्रभाग १५, जे, डे प्रभाग प्रत्येकी सात, कल्याण पूर्वेतील खडेगोळवली परिसरात चाळी सर्वाधिक असल्याने या भागात एकही धोकादायक इमारत नाही.

गेल्या वर्षापासून ब प्रभागात ११ धोकादायक इमारती, क प्रभाग ३९, फ प्रभागात २०, ह प्रभागात ३४, ग प्रभागात १२, ह प्रभागात १० इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षभरात एकूण १३८ धोकादायक इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या, असे अधिकाऱ्याने सांगितले.

नवीन बांधकाम विकास नियंत्रण नियमावलीनुसार या धोकादायक इमारतींचा चांगल्या पध्दतीने विकास होणार आहे. परंतु, मालक, भाडेकरू वादामुळे पुनर्विकासाचे विषय रखडले आहेत.