ठाणे : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेल्या येऊर भागातील तसेच श्रीनगर भागातील आदिवासी पाड्यावरील बांधवांसाठी ठाणे महापालिकेने सुरु केलेल्या फिरत्या आरोग्य केंद्राच्या माध्यमातून आतापर्यंत २३५ रुग्णांनी आरोग्य उपचार घेतले आहेत. त्यामध्ये सर्दी, ताप, उलटी, जुलाब, श्वसनाचे आजार, त्वचा विकार, कान-नाक-घसा आजारांच्या रुग्णांचा समावेश असून त्याचबरोबर चार गरोदर महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. या केंद्राच्या माध्यमातून परिसरातच मिळत असलेल्या आरोग्य सुविधेला आदिवासी बांधवांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या २६ लाखांच्या घरात पोहोचली आहे. त्यापैकी ५२ टक्के नागरिक हे झोपडी आणि चाळीमध्ये राहतात. आरोग्य निकषांनुसार प्रत्येक ३० ते ४० हजार लोकसंख्येसाठी एक आरोग्य केंद्र असणे आवश्यक आहे. परंतु ठाण्यात २७ आरोग्य केंद्र आहेत. त्यामुळे एक ते दीड लाख लोकसंख्येचा भार एका आरोग्य केंद्रावर पडतो. हा ताण कमी करण्यासाठी महापालिकेने शहरात ५० ठिकाणी आपला दवाखाना उपक्रम सुरु केला असून त्या माध्यमातून नागरिकांना मोफत आरोग्य सुुविधा पुरविण्यात येत आहे. असे असले तरी शहरातील आदिवासी पाड्यांवर अशी आरोग्य सुविधा उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना शहरात यावे लागते. काही वेळेस तात्काळ आरोग्य सुविधा न मिळाल्याने नागरिकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डाॅ. विपीन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाचे उपायुक्त मनीष जोशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी याठिकाणी फिरते आरोग्य केंद्र सुरु केले असून त्याचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले होते. आठवड्यातील ठरवून दिलेल्या दिवशी या केंद्राचे वाहन संबंधित पाड्यावर जाऊन विनामुल्य आरोग्य सुुविधा उपलब्ध करून देत आहे. या केंद्राच्या माध्यमातून २३५ रुग्णांनी आरोग्य उपचार घेतल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली. येऊर येथील रोणाचा पाडा, भेंडीपाडा, नारळीपाडा, आश्रम परिसर, पाटोणापाडा, वणीचा पाडा, जांभुळ पाडा या भागातील आदिवासी बांधवांसह दिवा भागातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्यात १८३ रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे, तर सप्टेंबर महिन्यात ५२ जणांची तपासणी करण्यात आली आहे.ऑगस्ट महिन्यात तपासणीदरम्यान सर्दी व तापाचे ३७, उलटी व जुलाबाचे ३७, श्वसनाच्या आजाराचे ४२, त्वचा विकाराचे ३७, कान-नाक-घसा आजारांचे ३० रुग्ण आढळून आले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. अशाच आजारांचे सप्टेंबर महिन्यातही रुग्ण आढळून आले आहेत. त्याचबरोबर चार गरोदर महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
आदीवासी पाडय़ातील नागरीकांना तत्काळ उपचार मिळावेत या उद्देशातून हे फिरते आरोग्य केंद्र सुरु करण्यात आले असून या आरोग्य केंद्राच्या माध्यमातून आदीवासी बांधवांना घराजवळच आरोग्य सुविधा मिळत असून या उपक्रमास आदिवासी बांधवांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
मनिष जोशी उपायुक्त, ठाणे महापालिका