कल्याणमधील महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या गस्ती पथकाने मंगळवारी रात्री कल्याण पश्चिमेतील एस. टी. आगार परिसरात मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी भारतीय चलनातील २५ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहे. यावेळी पोलिसांनी कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी आणि पत्रीपूल भागातील रहिवासी असणाऱ्या तीन तरुणांना अटक केली आहे.

रजनेश कुमार श्रीदुलारूचंद चौधरी (१९, रा. कोळसेवाडी), हर्षद नौशाद खान (१९, रा. पत्रीपूल) आणि अर्जुन राधेश्याम कुशवह (१९, रा. कोळसेवाडी) अशी अटक केलेल्या आरोपी तरुणांची नावं आहेत. कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागातील एस. टी. आगार परिसरात काही तरुण मंगळवारी रात्री भारतीय चलनातील बनावट नोटा वटविण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती महात्मा फुले पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांना मिळाली होती.

त्यानुसार साध्या वेशातील पोलिसांनी एस. टी. आगार परिसरात सापळा रचला. रेल्वे स्थानकातून बाहेर पडणाऱ्या आणि बसमधून उतरणाऱ्या प्रवाशांवर गस्ती पथकानं पाळत ठेवली. दरम्यान मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास कल्याण एस. टी. आगाराच्या प्रवेशद्वारावर तीन तरुण संशयास्पदरीत्या हालचाली करताना आढळले. त्यानंतर पोलिसांनी एकमेकांना इशारे देत तीन तरुण पळून जाऊ नयेत, म्हणून त्यांना प्रथम घेरलं.

साध्या वेशातील एका पोलिसानं हातात पिशवी असलेल्या तरुणाला सर्वप्रथम हटकलं. त्यावेळी तो गोंधळला. गस्ती पथकातील पोलिसांनी त्याच्यावर झडप टाकताच, इतर दोन तरुण पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. पण त्यांना आधीच घेरल्याने ते अलगद पोलिसांच्या कचाट्यात सापडले. संबंधित तरुणांकडे चौकशी केली असता, ते २५ हजार रुपयांच्या बनावट नोटा घेऊन कल्याण रेल्वे स्थानक परिसरात वटविण्यासाठी आलो होतो, अशी कबुली त्यांनी दिली. नोटांमध्ये १००, २०० आणि ५०० रूपयांच्या नोटा होत्या. पोलिसांनी यावेळी त्यांच्याकडून महागडा मोबाईल, दुचाकी जप्त केली. बनावट नोटा कुठून आणल्या आणि त्या कुठे वटविल्या जाणार होत्या, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.