मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे डोंबिवलीतील प्रचारसभेत वक्तव्य; समितीची शिवसेनेवर टीका
कल्याण, डोंबिवली शहरातील निवडणूक ही महापौर पदासाठी होत आहे. पण २७ गावांमधील निवडणूक ही या गावांची नगरपालिका करायची की नाही या विषयावर लढवली जात आहे. शेवटी गावांचा विकास करायचा असेल तर येथील जनतेने पालिकेत राहायचे की नगरपालिकेत जायचे याचा विचार करावा. येथील जनतेने संघर्ष समितीचे उमेदवार मोठय़ा संख्येने निवडून दिले तर राज्य सरकार न्यायालय, निवडणूक आयोगाला २७ गावांची जनता ही नगरपालिकेच्या बाजूची आहे असे ठासून सांगेल आणि गावांची स्वतंत्र नगरपालिका होण्याचा मार्ग मोकळा होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे केले.
सर्वपक्षीय ग्रामीण विकास समितीच्या उमेदवारांच्या प्रचार सभेला मुख्यमंत्री डोंबिवलीत मानपाडा येथे आले होते. समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेवर टीकेचे आसूड ओढले. सेनेच्या सर्व उमेदवारांना पराभूत करण्याचे आवाहन केले. मात्र अध्र्या तासाच्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर टीका करणे टाळले.
पक्षीय भेद बाजूला ठेवून विविध पक्षांचे उमेदवार संघर्ष समितीच्या झेंडय़ाखाली २७ गावांमधील निवडणूक लढवत आहेत. या उमेदवारांचा स्वतंत्र नगरपालिका हा एकच अजेंडा आहे. लोकशाहीत मुख्यमंत्री, मंत्र्यांपेक्षा जनता महत्त्वाची आहे. जनतेचे मत हे सार्वमत मानले जाते. नगरपालिका होण्याच्या दृष्टिकोनातून येथील जनतेने संघर्ष समितीच्या उमेदवारांना निवडून दिले तर नगरपालिका होण्याचा मार्ग सोपा होईल. एकदा नगरपालिका झाली की या गावांमध्ये विकास केंद्र आणि विकासाच्या माध्यमातून पाच वर्षांत अनेक कामे करण्यात येतील. गावांचा चेहरा बदलण्यात येईल. विकासाचे एक आदर्शवत प्रतिकृती म्हणून या गावांकडे पाहिले जाईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी दिला.
या भागात क्षेपणभूमी, कत्तलखान्यासारखी आरक्षणे टाकण्यात आली असतील त्याचाही नगरपालिका झाल्यानंतर प्राधान्याने विचार करण्यात येईल.
एमएमआरडीए क्षेत्रातील शहरे, गावांचे नागरीकरण होत आहे. त्यामुळे कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, २७ गाव परिसरात नागरी सुविधा देण्याचा राज्य सरकार प्रयत्न करीत आहे. हाच विचार करून राज्यात भाजप सरकार आल्यानंतर २७ गावांचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला. गावे स्वयंपूर्ण व्हावीत म्हणून या भागात एक हजार कोटीचे विकास केंद्र मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी खा. कपिल पाटील, राष्ट्रवादीचे संजीव नाईक, आमदार रवींद्र चव्हाण, रमेश पाटील, जगन्नाथ पाटील, समितीचे गुलाब वझे, चंद्रकांत पाटील, बळीराम तरे, अर्जुनबुवा चौधरी आदी उपस्थित होते.