विधान परिषद निवडणुकीत सेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक भारतीय जनता पक्षासोबत लढविणारे २७ गाव परिसरातील सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या नेत्यांनी यंदाच्या विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेची कोंडी करण्याचा निर्णय पक्का केला असून कँाग्रेस-राष्ट्रवादी कँाग्रेस आघाडीचे उमेदवार वसंत डावखरे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. यासंबंधी २७ गाव परिसरात नुकत्याच झालेल्या एका बैठकीत समितीच्या नेत्यांनी जाहीरपणे डावखरे यांना पाठिंबा देण्याची घोषणा केल्याने उपस्थित भाजप नेत्यांचे चेहरे उतरल्याचे चित्र होते. काहीही झाले तरी शिवसेनेसोबत जाणार नाही, असा पवित्रा यावेळी समितीच्या नेत्यांनी घेतला आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या तोंडावर २७ गावे वगळावीत यासाठी येथील संघर्ष समितीचे नेते प्रयत्नशील होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसा निर्णय घेतलाही, मात्र निवडणूक आयोगाच्या हस्तक्षेपामुळे ही गावे महापालिका हद्दीत ठेवणे भाग पडले. या प्रक्रियेत संघर्ष समिती आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये अनेकदा खटके उडाले. शिवसेनेला अंगावर घेत संघर्ष समितीने भाजपच्या साथीने गावांमध्ये निवडणूक लढविले. या गावांमध्ये भाजपचे अस्तित्व नगण्य होते. मात्र, संघर्ष समितीच्या मदतीने येथून भाजपचे सात नगरसेवक निवडून आले आणि शिवसेनेला मोठा फटका बसला. दरम्यान, विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत या गावांमधील संघर्ष समितीच्या तिघा नगरसेवकांनी डावखरे यांना पाठिंबा जाहीर केल्याने शिवसेना नेत्यांची पाचावर धारण बसली आहे. यासंबंधी निर्णय घेण्यासाठी नुकत्याच घेण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीत समितीच्या तिघा नगरसेवकांनी डावखरे यांना मतदान करणार असल्याचे जाहीर केले.
संघर्ष समितीच्या नेत्यांची नुकतीच डावखरे यांनी भेटली. संघर्ष समितीचे नेते पालकमंत्री एकनाथ िशदे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. स्थानिक आमदार सुभाष भोईर यांच्याशी या नेत्यांचे फारसे सख्य नाही. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेला मतदान करायचे नाही, अशी भूमिका समितीच्या नेत्यांनी घेतली आहे. भाजपने कोणतीही भूमिका घेतली तरी आमची वाट स्वतंत्र असेल, असा दावा समितीच्या नेत्यांनी या बैठकीत केला. या बैठकीस समितीचे गंगाराम शेलार, गुलाब वझे, चंद्रकांत पाटील, अर्जुनबुवा चौधरी उपस्थित होते.