कल्याण- कल्याण लोकसभा मतदार संघातील ग्रामीण भागातील डोंगर, निसर्गरम्य भाग पर्यटने स्थळे म्हणून विकसित करण्याच्या कामासाठी शासनाने २८ कोटीचा निधी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग केला आहे. यामुळे कल्याण ग्रामीण भागातील पर्यटन स्थळ विकास, रोजगाराला चालना मिळणार आहे, असे खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.
कल्याण लोकसभा मतदारसंघातील डोंबिवली जवळील दावडी, भाल भागातील उंबार्ली टेकडी भागात पक्षी अभयारण्य विकसित करणे, कांबा पावशेत येथील शिवमंदिर विकास, दुर्गाडी किल्ल्याची डागडुजी करणे, कांबा येथील तलावाचे सुशोभिकरण करण्याची कामे या निधीतून केली जाणार आहेत. हा निधी मिळविण्यासाठी खा. शिंदे यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता. मनसेचे आ. प्रमोद पाटील यांनी आपल्या कल्याण ग्रामीण मतदारसंघ हद्दीतील भाल भागातील उंबार्ली टेकडी येथील पक्षी अभयारण्य विकसित करणे, या भागात जैवविविधता उद्यान विकसित करणे या कामांसाठी मागील तीन वर्षापासून शासनाकडे पाठपुरावा केला होता. या दोन्ही लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे कल्याण ग्रामीण पर्यटन विकासासाठी निधी उपलब्ध झाला आहे.कल्याण परिसरातील सुशोभिकरणासाठी निधी मिळावा म्हणून खा. डाॅ. शिंदे शासनाकडे तगादा लावून होते.मलंगगड, पलावा, शिळफाटा परिसरात नवीन वसाहती उभ्या राहत आहेत. या भागातील रहिवाशांना मनोरंजनासाठी जवळपास ठिकाण असावे या विचारातून पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी हा निधी तात्काळ मंजूर केला.




हेही वाचा >>>डोंबिवलीत गृह प्रकल्पाच्या उद्वाहन खड्ड्यात पडून चालकाचा मृत्यू
मलंगगड विकासासाठी १० कोटीचा निधी मंजूर आहे. या निधीतून डोंगरावर जाणाऱ्या पायऱ्या सुस्थितीत करणे, संरक्षित कठडे असावेत यादृ्टीने नियोजन केले आहे. ही कामे प्रगतीपथावर आहेत. दुर्गाडी किल्ला विकासासाठी पाच कोटीचा निधी मंजूर आहे. या निधीतून किल्ला डागडुजी, सुशोभिकरणाची कामे केली जाणार आहेत. खा. शिंदे यांच्या बरोबरीने आ. प्रमोद पाटील उंबार्ली टेकडीवर पक्षी अभयारण्य व जैवविविधता उद्यान विकासासाठी शासनाकडे पाठपुरावा करत होते. या कामासाठी पाच कोटीचा निधी उपलब्ध झाला आहे. दररोज शेकडो नागरिक उंबार्ली टेकडीवर फिरण्यासाठी जातात. पावसाळ्यात हा परिसर गर्द हिरवाईने निसर्गरम्य होतो. अनेक पक्षीप्रेमी येथे तळ ठोकून असतात.ग्रामीण भागातील पर्यटन स्थळ, धार्मिक स्थळ परिसर विकासासाठी निधी मिळाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. या निधीवरुन मनसेचे पाटील आणि खा. शिंदे यांच्यात श्रेयवादावरुन कलगीतुरा रंगण्याची चिन्हे आहेत.
(