ठाण्यातील वागळे इस्टेट येथील चेकमेट सव्‍‌र्हिसेस कंपनीतील दरोडय़ाप्रकरणी आणखी तीन दरोडेखोरांना ठाणे पोलिसांनी नाशिकमधून अटक केली. त्यांच्याकडून दोन कोटी ३५ लाखांची रोकड हस्तगत केली. या तिघांमुळे आरोपींची संख्या नऊ झाली आहे.

ठाणे पोलिसांनी शुक्रवारी अटक केलेल्या सहा जणांसह शनिवारी पकडलेल्या त्या तिघांना ठाणे न्यायालयाने १० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरोडय़ाप्रकरणी अगोदर अटक केलेल्या सहा जणांची कोणतीही गुन्हेगारी पाश्र्वभूमी नसल्याचे स्पष्ट झाले आहे, तर शनिवारी पकडलेल्या तिघांची गुन्हेगारी पाश्र्वभूमी असल्याचे समोर आले आहे.

ठाणे शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या तीन हात नाका परिसरात मंगळवारी पहाटे दरोडा पडला होता. ही कंपनी वित्त संकलन आणि वित्तपुरवठा करण्याचे काम करते.  शनिवारी योगेश चव्हाण (२९), पांडुरंग चव्हाण (२९) आणि नवनाथ चव्हाण (२८) या तिघांना नाशिक, इगतपुरी येथून अटक केली. ते तिघे नाशिकच्या माणिकखांब या गावातील रहिवाशी आहेत. तिघे नातेवाईक असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सहा कोटी ५१ लाखांची रोकड हस्तगत..

चेमकेट कंपनीतील दरोडय़ात दरोडेखोरांनी नऊ कोटी १६ लाखांची रोकड लांबवली होती. त्यातील आतापर्यंत सहा कोटी ५१ लाखांची रोकड हस्तगत केली आहे. शुक्रवारी ४ कोटी वीस लाख, तर शनिवारी २ कोटी ३५ लाखांची रोकड पोलिसांना मिळून आली आहे.