बेकायदा बांधकामे आणि टक्केवारीच्या पायावर पोसल्या गेलेल्या ठाणे महापालिकेतील राजकीय व्यवस्थेला एकामागोमाग एक असे धरक्के बसू लागले असून बेकायदा बांधकामात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहभाग असल्याचा ठपका ठेवत तिघा नगरसेवकांचे पद मंगळवारी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी रद्द ठरविले. पद रद्द झालेल्या नगरसेवकांमध्ये माजी महापौर व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक मनोहर साळवी, शिवसेनेचे राम एगडे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शैलेश पाटील या तिघा नगरसेवकांचा समावेश आहे. बेकायदा बांधकामप्रकरणी आणखीही काही नगरसेवकांवर टाच येण्याची शक्यता महापालिका वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
राजकीय आघाडीवरील सावळ्यागोंधळामुळे ठाणे महापालिकेच्या अब्रूचे गेल्या काही महिन्यांपासून अक्षरश: धिंडवडे निघत आहे. बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी चार नगरसेवकांविरोधात गुन्हा दाखल झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच बेकायदा बांधकामप्रकरणी तिघा नगरसेवकांचे पद रद्द करून आयुक्त संजीव जयस्वाल यांनी महापालिकेतील किडलेल्या राजकीय व्यवस्थेचे शुद्धीकरण करण्याची प्रक्रिया सुरू केल्याची चर्चा रंगली आहे. बेकायदा बांधकामप्रकरणी या नगरसेवकांविरोधात तक्रारी दाखल होऊनही गेल्या काही वर्षांपासून केवळ सुनावणीची प्रक्रिया सुरू होती. यासंबंधी अखेरची सुनावणी घेताना आयुक्त जयस्वाल यांनी साळवी, एगडे आणि पाटील या तिघांचेही पद रद्द करत असल्याचा निर्णय मंगळवारी दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
