मनाल्यांतून गाळ काढून ते साफ करण्याचे काम जोरात सुरू असल्याचा पालिका अधिकाऱ्यांचा दावा आहे. मात्र, अजूनही अनेक ठिकाणी नाले तुंबलेलेच पाहायला मिळत आहेत. या पाश्र्वभूमीवर नालेसफाईसाठी प्रशासनाने दिलेली ३१ मेची मुदत यंदाही टळेल, असे चित्र आहे. पालिका अधिकारी मात्र, ठरलेल्या वेळेत कामे पूर्ण होतील, असे सांगत आहेत.
पावसाळय़ापूर्वी नाल्यांतील गाळ व कचरा हटवला न गेल्यास पावसाळय़ात नाले तुंबून परिसर जलमय होण्याची भीती असते. त्यामुळे ३१ मेपूर्वी नालेसफाईची कामे पूर्ण करण्याचे आदेश पालिका प्रशासनाने दिले आहेत. मात्र, मुदत संपायला अवघे आठ दिवस उरले असताना अद्याप ३० टक्के नाल्यांचीच सफाई झाल्याचे चित्र आहे. या संदर्भात मलनिस्सारण विभागाचे कार्यकारी अभियंता रवींद्र जौरस यांच्याशी संपर्क साधला असता, ३१पूर्वी सर्व कामे पूर्ण होतील, असे ते म्हणाले. ‘पालिका हद्दीत ५० किलोमीटरचे नाले आहेत. त्यामध्ये ४५ नाले हे मोठय़ा स्वरूपाचे आहेत. या नाल्यांच्या सफाईसाठी सुमारे १ कोटी ८३ लाखांचे ठेके देण्यात आले आहेत. नालेसफाईची कामे सर्वत्र सुरू आहेत,’ असे ते म्हणाले. तसेच मोठय़ा नाल्यांची सफाई पावसाला सुरुवात झाल्यानंतरच करता येईल, असेही ते म्हणाले. ‘प्रभागातील कामे स्थानिक पातळीवर केली जातात. मोठय़ा नाल्यांची सफाई मेपूर्वी करून घेतली तर पावसाळा सुरू झाल्यावर परिसरातील घाण, गाळ, झुडपे नाल्यात आणून टाकली जातात. हे दरवर्षी निदर्शनास येते. त्यामुळे पावसाला सुरुवात होताच मोठय़ा नाल्यांची सफाई करणे सोपे जाते,’ असा दावा जौरस यांनी केला.

‘कामे वाटपामध्ये गैरप्रकार’
नालेसफाईची कामे वाटताना पालिका प्रशासनाकडून गैरप्रकार केला जात असल्याचा आरोप मनसेचे नगरसेवक शरद गंभीरराव यांनी केला. नालेसफाईची कोटय़वधी रुपयांची कामे ठेकेदारांना देण्यात येतात. प्रभागातील कामे मजूर संस्थांना दिली जातात. वेगवेगळ्या प्रभागांमधील बहुतांशी गटारे बंदिस्त करण्यात आली आहेत. जेथे मेनहोल आहे तेवढय़ा चार ते पाच फूट परिसरातील गटारसफाई केली जाते. उर्वरित सफाई तशीच टाकून दिली जाते, असा आरोप त्यांनी केला.