शहापूर तालुक्यातील वेहळोली येथील मुक्तजीवन सोसायटीच्या देशी कोंबड्या आणि फार्ममधील बदके बर्ड फ्ल्यूने मृत पावल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. गेल्या काही दिवसांत ३०० हून अधिक कोंबड्या दगावल्याने आसपासच्या परिसरात खळबळ माजली असून पशुसंवर्धन विभागाने एक किलोमीटर परिघातील किमान १५ हजारहून अधिक कोंबड्या शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्याची मोहीम हाती घेतली आहे. याबाबत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन देखील पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अचानक कोंबड्या मरू लागल्याने संशय

शहापूर तालुक्यातील वेहळोली (वासिंद) येथे मुक्तजीवन सोसायटी असून या सोसायटीच्या शेडमधील देशी कोंबड्या व बदके अचानक मृत पावत होते. याबाबत मुक्तजीवन सोसायटीने वासिंद येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात कळविले. त्यानुसार पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र उपचारांनंतरही कोंबड्या दगावत असल्याने मृत कोंबड्यांचे शवविच्छेदनाचे व जिवंत कोंबड्यांच्या रक्ताचे नमुने पुणे येथील रोग अन्वेषण विभागाकडे तपासणीसाठी ११ फेब्रुवारीला पाठविण्यात आले. त्याबाबतच्या अहवालामध्ये बर्ड फ्लू झाल्याचे निष्पन्न आले.

मुक्तजीवन सोसायटीतील सर्व कोंबड्या दगावल्या

यानंतर पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. अजित हिरवे व डॉ. जी. जी. चांदोरे यांच्यासह ७० जणांच्या पथकाने वेहळोली येथील मुक्तजीवन सोसायटीमध्ये धाव घेतली. त्यादरम्यान मुक्तजीवन सोसायटीच्या शेडमधील सर्वच कोंबड्या दगावल्या असून लगतच्या शेड मधील किमान १०० कोंबड्या व काही बदके सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. 

एक किमी परिसरातील कोंबड्या, अंडी नष्ट करणार

दरम्यान, बाधित क्षेत्रापासून एक किमीच्या परिघात असलेल्या पोल्ट्री फार्ममधील कोंबड्या. तसेच त्यांचे खाद्य व अंडी शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्याची मोहीम पशुसंवर्धन विभागाने हाती घेतली असून बधित क्षेत्र संसर्गमुक्त होईपर्यंत बाधित क्षेत्राच्या एक किलोमीटर परिघातील चिकन विक्रेते, वाहतूकदारांचे दैनंदिन कामकाज रोखण्याबाबतही ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत. दरम्यान, कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात येत आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 300 hens died due to bird flue in shahapur district chaos among people pmw
First published on: 17-02-2022 at 19:26 IST