ठाणे : जिल्ह्यात स्वाइन फ्लूच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून आतापर्यंत जिल्ह्यात ३४२ स्वाइन फ्लूच्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे, तर जिल्ह्यात स्वाइन फ्लूमुळे नऊ जणांचा मृत्यू झाला आहे.

शहरी भागात मोठय़ा प्रमाणात स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून येत असून यामध्ये ठाणे शहरातील सर्वाधिक रुग्णांचा समावेश आहे. स्वाइन फ्लू आणि करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे. सध्या एकीकडे वातावरण बदलामुळे साथीचे आजार पसरले आहेत. सध्या नागरिकांनी मुखपट्टीचा वापर करणेही सोडून दिले आहे. तसेच गर्दीमध्ये नागरिक जात आहेत. त्यामुळे स्वाइन फ्लूबाधितांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात तीन दिवसांपूर्वी स्वाइन फ्लूने मृत्यू झालेल्यांची संख्या सात होती. त्यात आता दोनने वाढ झाली असून ही संख्या नऊवर पोहोचली आहे. यामध्ये ठाणे शहरातील पाच, कल्याण-डोंबिवली तीन आणि अंबरनाथमधील एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात स्वाइन फ्लूमुळे मृत्यू होणाऱ्यांमध्ये सहव्याधी आणि ज्येष्ठ नागरिकांचा समावेश असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. तर तीन ते चार दिवसांपूर्वी जिल्ह्यातील स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या ३०७ होती. यामध्ये तीन ते चार दिवसांत ३५ ने वाढ झाली असून जिल्ह्यातील स्वाइन फ्लूबाधितांचा आकडा ३४२ झाला आहे. यामध्ये ठाणे २४५, कल्याण-डोंबिवली ५०, नवी मुंबई ३०, मीरा-भाईंदर सहा, बदलापूर सहा, ठाणे ग्रामीण चार आणि अंबरनाथमधील एक रुग्ण आहे.

जिल्ह्यात सध्या १४४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये ठाणे ११२, कल्याण-डोंबिवली २२, नवी मुंबई नऊ आणि ठाणे ग्रामीणमधील एका रुग्णाचा समावेश आहे.