रूळ ओलांडताना सर्वाधिक अपघात

वसई रेल्वे पोलिसांच्या हद्दीत अपघातांचे प्रमाण वाढतच असून गेल्या दोन महिन्यांत तब्बल ३५ प्रवाशांना जीव गमवावा लागला. या विविध अपघातांत ५९ प्रवासी जखमी झालेले आहे. सर्वाधिक म्हणजे २२ मृत्यू हे रेल्वे रूळ ओलांडताना झालेले आहेत.

पश्चिम रेल्वेचा मीरा रोड ते वैतरणादरम्यानचा परिसर वसई रोड रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. हा भाग सर्वाधिक अपघाताचे क्षेत्र मानला जातो. चालू वर्षांत १ जानेवारी ते २९ फेब्रुवारी या दोन महिन्यांत झालेल्या अपघातात ३५जण दगावले असून ५९ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ३१ पुरुष आणि ४ महिलांचा समावेश आहे, तर जखमींमध्ये ४४ पुरुष आणि १५ महिलांचा समावेश आहे. सर्वाधिक मृत्यू हे रूळ ओलांडताना झालेल्या अपघातामुळे झाले आहेत. रूळ ओलांडताना ट्रेनने दिलेल्या धडकेत २२ जणांचा मृत्यू झाला. काही प्रवाशांचा मृत्यू हा लोकल ट्रेनमधील गर्दीतून पडून झालेला आहे.

रेल्वे प्रवाशांनी रेल्वे रूळ ओलांडू नये यासाठी रेल्वेने विशेष अभियान घेतले होते. मानवी साखळी करून धोकादायक रेल्वे रूळ ओलांडू नका, असे आवाहन प्रवाशांना केले होते. अनेकांवर दंडात्मक कारवाईही करण्यात आली होती. परंतु तरीही या अपघातांची संख्या वाढत आहे.विरार रेल्वे फाटक धोकादायक

विरार पूर्व आणि पश्मिचेला जोडणारे जुने रेल्वे फाटक मृत्यूचा सापळा बनत चालले आहे. या दोन महिन्यांत या ठिकाणी आठ प्रवाशांचा रेल्वे रूळ ओलांडताना मृत्यू झालेला आहे. या ठिकाणी उड्डाणपूल बांधला आहे. मात्र त्यात नागरिकांसाठी जिना बांधला नसल्याने रहिवाशांना रेल्वे फाटक ओलांडून जावे लागते. त्या ठिकाणी अपघातांची मालिका सुरू आहे. उड्डाणपुलावर पादचाऱ्यांसाठी जिना बांधावा, अशी मागणी पूर्वीपासून होत आहे. नुकतीच आयुक्तांनी पाहणी करून जिना बांधण्याचे आदेशही दिले.