scorecardresearch

मुंबईत १११, तर ठाण्यात ३७ गोविंदा जखमी; दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट

दहीहंडी फोडताना शुक्रवारी दिवसभरात मुंबईत १११ गोविंदा, तर ठाणे शहरात ३७ गोविंदा जखमी झाले.

मुंबईत १११, तर ठाण्यात ३७ गोविंदा जखमी; दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट
प्रतिनिधिक छायाचित्र

मुंबई : दहीहंडी फोडताना शुक्रवारी दिवसभरात मुंबईत १११ गोविंदा, तर ठाणे शहरात ३७ गोविंदा जखमी झाले. त्यांच्यावर शासकीय आणि महापालिका रुग्णालयात उपचार करण्यात आले. मुंबईतील ८८ गोविंदांना उपचार करून घरी सोडण्यात आले, तर उर्वरित २३ जण रुग्णालयात दाखल आहेत. ठाण्यातील २९ जखमी गोविंदांना प्राथमिक उपचारानंतर सोडण्यात आले, तर आठ जणांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, अनेक ठिकाणी गोविंदा पथकांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळले. मानवी मनोरे रचण्यासाठी १४ वर्षांखालील मुलांचाही सर्रास समावेश करण्यात आला. आवाजाच्या मर्यादेचेही उल्लंघन झाले. 

करोना महासाथीमुळे दोन वर्षांनंतर दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. त्यामुळे त्याचा उत्साह ओसंडून वाहत होता. विविध ठिकाणी दहीहंडी फोडण्यासाठी पथकांनी गर्दी केली होती. दहीहंडी फोडताना दिवसभरात मुंबईच्या विविध भागांत १११ गोविंदा जखमी झाले. शासकीय आणि पालिका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. नायर रुग्णालयात ११, जे जे रुग्णालय २, सेट जॉर्जेसमध्ये ३, जीटी रुग्णालयात १२, केईएम रुग्णालयात ३०, शीव रुग्णालयात १७, जोगेश्वरी ट्रॉमा रुग्णालयात ६, कांदिवली येथील डॉ आंबेडकर रुग्णालयात दोघांना दाखल करण्यात आले. कूपर रुग्णालयात ६, व्ही. एन. देसाई रुग्णालयात ८, राजावाडी १०, वरळीच्या पोद्दार रुग्णालयात ६, बांद्र्यातील भाभा रुग्णालयात ५ तर अगरवाल रुग्णालयात एकाला दाखल करण्यात आले होते. दिवसभरात दाखल झालेल्या गोविंदापैकी ८८ जणांना उपचार करून सोडण्यात आले, तर उर्वरित २३ जण रुग्णालयात दाखल असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

ठाण्यात आठ जण रुग्णालयात

ठाणे : ठाणे शहरात विविध दहीहंडी उत्सवादरम्यान सायंकाळपर्यंत ३७ गोविंदा जखमी झाले. यातील २९ जणांवर रुग्णालयात प्राथमिक उपचार करून सोडण्यात आले, तर ८ जणांवर उपचार सुरु आहेत. वडाळा येथील सूरज पारकर (३८) हा गोविंदा तीनहात नाका येथे दुचाकीवरून पडून जखमी झाला. त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ठाणे महापालिकेने शहरातील मुख्य आठ दहीहंडीच्या ठिकाणापैकी चार ठिकाणी चार वैद्यकीय पथके कार्यरत ठेवली होती. तर उर्वरीत चार ठिकाणी एक वैद्यकीय पथक फिरते ठेवले होते.

नियमांची ऐशीतैशी : अनेक गोविंदा पथकांतील गोविंदा दुचाकीवर स्वार होऊन वाहतुकीचे नियम पायदळी तुडवत होते. एकाच दुचाकीवरून तीन-चार गोविंदा भरधाव वेगाने जाण्याचे दृश्य तर सर्वत्रच दिसत होते. मुंबईत ठिकठिकाणी दुचाकीस्वारांचा स्वैरसंचार होता. टेम्पो, ट्रकमधून नियमबाह्य पद्धतीने गोविंदांची वाहतूक करण्यात येत होते. गोविंदांचे ट्रक, टेम्पो, मोटारगाडय़ा आणि दुचाकींमुळे दहीहंडी उत्सवस्थळाच्या आसपासच्या भागात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. अनेक ठिकाणी मानवी मनोरे रचण्यासाठी १४ वर्षांखालील मुलांचाही पथकांमध्ये सर्रास समावेश करण्यात आला होता. आवाजाच्या मर्यादेचेही अनेक ठिकाणी उल्लंघन झाले होते.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या