376 customers registered for home purchase in the property exhibition in thane zws 70 | Loksatta

ठाणे : यंदाच्या मालमत्ता प्रदर्शनात ३७६ ग्राहकांनी केली घरखरेदीसाठी नोंदणी, ९७० कोटी रुपयांचे गृहकर्जाला मंजुरी

या चार दिवसीय प्रदर्शनाला २७ हजार ४६५ नागरिकांनी भेट देऊन त्यापैकी ३७६ ग्राहकांनी घर खरेदीसाठी नोंदणी केली आहे.

ठाणे : यंदाच्या मालमत्ता प्रदर्शनात ३७६ ग्राहकांनी केली घरखरेदीसाठी नोंदणी, ९७० कोटी रुपयांचे गृहकर्जाला मंजुरी

प्रदर्शनाला २७ हजारहून अधिक नागरिकांनी दिली भेट * प्रदर्शन डिजिटल स्वरुपात पुढील तीन महिने सुरू ठेवण्याचा निर्णय

ठाणे महापालिका क्षेत्रासह आसपाच्या शहरांमध्ये मध्यमवर्गीयांपासून ते उच्चभ्रु गटासाठी उपलब्ध असलेल्या १८ लाखांपासून ते पाच कोटी रुपयांपर्यंच्या घरांचे पर्याय यंदा ठाण्याच्या मालमत्ता प्रदर्शनातून ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आला होता. या चार दिवसीय प्रदर्शनाला २७ हजारहून आधिक नागरिकांनी भेट देऊन त्यापैकी ३७६ ग्राहकांनी घर खरेदीसाठी नोंदणी केली आहे. याशिवाय, या प्रदर्शनात सहभागी झालेल्या बँकांनी ९७० कोटी रुपयांचे गृहकर्ज मंजुर केले. या प्रदर्शनाला ग्राहकांचा मिळालेला प्रतिसाद पाहून हे प्रदर्शन एमसीएचआय वेबसाईच्या माध्यमातून डिजिटल स्वरुपात पुढील तीन महिने सुरू ठेवण्याचा निर्णय बांधकाम संघटनेने घेतला आहे. यापुर्वी झालेल्या प्रदर्शनात बांधकाम व्यवसायिक ग्राहकांना प्रकल्पाची माहिती देण्यासाठी पुस्तिका उपलब्ध करून देत होते. परंतु यंदा डिजीटल माध्यमांचा वापर करून त्याद्वारे गृह प्रकल्पांची माहिती ग्राहकांना देण्यात आल्याचे दिसून आले.

हेही वाचा >>> कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात वाचनालयाची उभारणी; महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचा निर्णय

ठाणेकरांना एकाच छताखाली मालमत्ता आणि गृह कर्ज घेण्याचा पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी क्रेडाई एमसीएचआय संस्थेच्यावतीने यंदाही मालमत्ता प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. ३ ते ६ फेब्रुवारी या कालावधीत ठाण्यातील रेमंड मैदानात हे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनात अल्प, मध्यम आणि उच्च अशा तिन्ही गटांसाठी १८ लाखांपासून ते पाच कोटी पर्यंतच्या किमतीच्या घरांचे पर्याय ग्राहकांपुढे उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यात ४० लाखांच्यापुढच्या किंमतीची घरे ठाणे शहरातील होती. तर, १८ लाखांपासून पुढच्या किंमतीच्या घरे भिवंडी, शहापूर, खर्डी, कर्जत या भागातील होती. या प्रदर्शनामध्ये ५० बांधकाम व्यवसायिक सहभागी झाले होते. एकूण १०० प्रकल्प प्रदर्शनात मांडण्यात आले होते. गेल्यावर्षीपेक्षा यंदाच्या प्रदर्शनात विकासकांचा सहभाग २५ टक्क्यांनी वाढला होता. या चार दिवसीय प्रदर्शनाला २७ हजार ४६५ नागरिकांनी भेट देऊन त्यापैकी ३७६ ग्राहकांनी घर खरेदीसाठी नोंदणी केली आहे. याशिवाय, या प्रदर्शनात सहभागी झालेल्या बँकांनी ९७० कोटी रुपयांच्या गृहकर्जाला मंजुरी दिली आहे.

हेही वाचा >>> हिम्मत असेल तर माझ्यासमोर नगरसेवकांची निवडणुक लढा; नरेश म्हस्के यांनी दिले आदित्य ठाकरेंना खुले आव्हान

ठाण्यात घर घेणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे, असा समज होता. परंतु हा समज चुकीचा असल्याचे यंदाच्या मालमत्ता प्रदर्शनाच्या निमित्ताने समोर आले आहे.  शहरात यापूर्वी ३०० ते ३५० चौरस फूटांची घरे ही वन रूम किचनपुरती मर्यादित होती. परंतु याच आकारांच्या घरांमध्ये वनबीएचके बनविला जात आहे. या घरांच्या किंमती परवडणाऱ्या असल्याने मध्यमवर्गीय ग्राहकांचा या घरांच्या खरेदीकडे कल असल्याचे दिसून आले. ठाणे शहराप्रमाणे भिवंडी, शहापूर, खर्डी, कर्जत या भागातही मोठ्याप्रमाणात नागरिकीकरण वाढले असून या भागातही मोठे गृहप्रकल्प उभे राहत आहेत. याठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात. अशा ग्राहकांनाही या प्रदर्शनात सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. भिवंडी बाह्यवळण महामार्गालगतचे अनेक प्रकल्पांचे स्टाॅल प्रदर्शनात उपलब्ध होते. या घरांच्या किंमती १८ लाखांपासून पुढे तर ३० लाखांपासून पुढे दुकाने उपलब्ध होती. खर्डी, शहापूर, कर्जत यांसारख्या भागातील जमिनी आणि बंगल्यांचे पर्याय प्रदर्शनात उपलब्ध होते. या प्रदर्शनात गृहपयोगी लागणाऱ्या वस्तूंचेही स्टाॅल उपलब्ध करून देण्यात आले होते.

हेही वाचा >>> बेकायदा बांधकामांच्या पाडकामाचे अहवाल देण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे आदेश; अधिकाऱ्यांवर निलंबन कारवाईचा बडगा?

मुंबई महानगर क्षेत्रामधील ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात गृह प्रकल्प उभे राहत असून हे प्रकल्प ठाण्याच्या रिअल इस्टेटचे महत्त्व अधोरेखित करते.  ठाणे शहर हे एक सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध आणि सुरक्षित आहे, या शहराची जीवनशैली चांगली आहे. त्यामुळे घर शोधणाऱ्या कुटुंबासाठी त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी ठाणे हा उत्तम पर्याय आहे. केवळ मुंबई महानगर क्षेत्रातच नव्हे तर देशभरातील सर्वोत्कृष्ट शहरी समूहांपैकी ठाणे एक आहे.  एखादी व्यक्ती प्रदर्शनाला भेट देऊ शकली नसेल तर त्यांना डिजिटल स्वरुपात हे प्रदर्शन पाहता येणार आहे. त्यासाठी एमसीएचआय वेबसाईच्या माध्यमातून डिजिटल स्वरुपात पुढील तीन महिने हे प्रदर्शन सुरू राहील. क्रेडाई एमसीएचआय ठाणे ही रिअल इस्टेटची संघटना आहे. जी केवळ ठाण्यात गृह प्रकल्प उभारत नाही तर सामाजिक बांधिलकीही जपण्याचे काम करत आहे. संस्थेच्या माध्यमातून २० वे प्रदर्शन आयोजित करण्यात येते. तेव्हा खरोखरच तुमच्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात आणण्यासाठी ते एक आदर्श व्यासपीठ असते.

जितेंद्र मेहता अध्यक्ष, क्रेडाई एमसीएचआयचे ठाणे

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 21:05 IST
Next Story
कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात वाचनालयाची उभारणी; महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचा निर्णय