बदलापूर : मतदार विशेष पुनरिक्षण अभियान प्रक्रियेच्या मुद्द्यावरून रविवारी बदलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष आणि आरपीआय (आर.के.) च्यावतीने केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आणि एसआयआर प्रक्रिया रद्द करण्याची आक्रमक मागणी केली. जुन्या नगरपरिषदेजवळ केलेल्या आंदोलनात ज्ञानेश कुमार हे सत्ताधारी भाजपच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप करत, आंदोलकांनी चक्क एका खेळण्यातील रिमोट कंट्रोल कारवर ज्ञानेश कुमार यांचा फोटो लावून गाडी चालवली.

या कृतीतून ज्ञानेश कुमार हे भाजपच्या रिमोट कंट्रोलवर चालतात, असा खोचक संदेश दिला. सोबतच, वादग्रस्त ठरलेल्या ‘एसआयआर’ प्रक्रियेअंतर्गत भरल्या जाणाऱ्या अर्ज क्रमांक ६ ची भररस्त्यात होळी केली.केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राबवलेल्या एसआयआर प्रक्रियेमुळे देशातील तब्बल १२ कोटी मतदार मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहण्याची भीती आहे. हा थेट लोकशाही आणि संविधानाला पायदळी तुडवण्याचा प्रकार असल्याचा आरोप आंदोलकांनी यावेळी केला. संविधानाने दिलेल्या मतदानाच्या हक्कावर गदा आणणारी ही अन्यायकारक प्रक्रिया तत्काळ रद्द करावी आणि ज्ञानेश कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

हे लक्षवेधी आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. याप्रसंगी राष्ट्रवादीचे बदलापूर शहराध्यक्ष रमेश चव्हाण, अंबरनाथ शहराध्यक्ष सलीम खान, वांगणी शहराध्यक्ष भूषण देशमुख, कमलाकर भोईर यांच्यासह आरपीआयचे (आर.के.) अध्यक्ष राजाराम खरात, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मतदार यादीचा घोळ सुरूच

मतदार यादीतील पुनरिक्षण मोहिमेला मुदतवाढ दिली असली तरी यादीतील घोळ संपता संपत नाही. यात अनेकांची नावे वगळल्याने संताप व्यक्त होत असताना ज्यांची नावे प्रारूप यादीत आहेत आणि ज्यांच्या घरी जाऊन अधिकाऱ्यांनी पडताळणी केली त्यांनाही आता पुन्हा कागदपत्रे सादर करण्याची नोटीस देण्यात आल्याने मतदारांमध्ये नाराजी आहे. पहिल्यांदा जेव्हा घरी अर्ज तपासून भरण्यात आले तेव्हाच अतिरिक्त कागदपत्रे का घेतली गेली नाहीत, असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.