scorecardresearch

ठाणे: शेतकऱ्यांना मिळतोय ‘ सिंचन विहिरीचा ‘ आधार; सिंचन विहिरींच्या उभारणीकरिता जिल्ह्यात ४ कोटींचे आर्थिक सहाय्य

जमिनीत उत्तम पीक येण्यासाठी जमिनीत पिका योग्य ओलावा टिकवून ठेवणे महत्वाचे असते.

nidhi fund
(संग्रहित छायचित्र)/ लोकसत्ता

जमिनीत उत्तम पीक येण्यासाठी जमिनीत पिका योग्य ओलावा टिकवून ठेवणे महत्वाचे असते. यासाठी शेतकऱ्यांना मुबलक पाणी भासते.शेतकऱ्यांना हीच सिंचनाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनातर्फे बिरसा मुंडा कृषी क्रांति योजना राबविली जात आहे. अनुसूचीत जमातीच्या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी ही योजना राबविली जात असून याअंतर्गत ठाणे जिल्ह्यात मागील दोन वर्षाच्या कालावधीत लाभार्थी शेतकऱ्यांना विहीर उभारणी करीता एकूण चार कोटी रुपयांचे आर्थिक साहाय्य करण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतातच मुबलक पाणी उपलब्ध झाले असून त्यांच्या पीक उत्पादनात देखील वाढ झाली असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. तर यंदाच्या आर्थिक वर्षासाठी निवड झालेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना सिंचन विहिर उभारणीसाठी १ कोटी ७० लाख रुपयांचा निधी राज्य शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे.

हेही वाचा >>>ठाण्यात भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेनेत रंगला श्रेयवाद, दिवा कचराभुमी बंद करण्यासाठी प्रयत्न केल्याचा दोघांचा दावा

ठाणे जिल्ह्याला एक मोठा ग्रामीण भाग लाभला असून येथील बहुतांश नागरिक हे शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. तसेच जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून कृषी क्षेत्रात देखील मोठी प्रगती होताना दिसून येत आहे. जिल्ह्यात आंबा पिकाचे उत्तम उत्पादन घेतले जात असून यावर्षी सुमारे ९०० हेक्टर क्षेत्रावर आंबा पिकाची लागवड करण्यात आली आहे. तर जिल्ह्यातील आंब्यांना दरवर्षी बाजारात उत्तम मागणी देखील असते. याबरोबरच यावर्षी जिल्ह्यात फुलारोपांची दखल मोठया प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. यामध्ये शेतकऱ्यांकडून अधिक उत्पन्न देणाऱ्या मोगरा पिकाची लागवड करण्यात आली आहे. तसेच अंबरनाथ तालुक्या यावेळी सीताफळाची देखील मोठया प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. यासर्व गोष्टी लक्षात घेता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध व्हावे यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहे. याच अंतर्गत जिल्ह्यातील अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांति योजना आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वालंबन योजना राबविण्यात येत आहे. यामध्ये जिल्हा परिषदेमार्फत लाभार्थी शेतकऱ्यांची निवड करून नव्याने विहीर उभारण्यासाठी तसेच शेतात असलेल्या विहिरींची दुरुस्ती साठी योजना निहाय आर्थिक साहाय्य करण्यात येते. यामुळे शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न मार्गी लागत आहे. मागील दोन वर्षाच्या कालावधीत विहिरी उभारणीसाठी शेतकऱ्यांना सुमारे ४ कोटी रुपयांचे आर्थिक साहाय्य मिळाले आहे. तसेच या अंर्गत मंजूर झालेल्या मात्र बांधकाम सुरु असलेल्या विहिरींचे देखील बांधकाम लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

हेही वाचा >>>ठाणे: नव्या ठाण्याच्या खाडी पूलांसाठी एमएमआरडीएच्या हालचाली

वर्ष – २०२० – २१

मंजूर झालेला निधी – २ कोटी २७ लाख

लाभार्थी शेतकरी – ८२

वर्ष – २०२१ – २२
मंजूर झालेला निधी – १ कोटी ७० लाख

लाभार्थी शेतकरी – ८५

वर्ष – २०२२ – २३

मंजूर झालेला निधी – १ कोटी ७६ लाख

लाभार्थी शेतकरी – ४३

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-02-2023 at 17:23 IST