कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेच्या विविध भागातील शाळांमध्ये चैत्रपाडव्याच्या दिवशी ४०३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. या विद्यार्थ्यांची पटनोंदणी आयुक्तांनी स्वहस्ताक्षरात केली. गुलाब पुष्प देऊन आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड, शिक्षण विभागाचे उपायुक्त संजय जाधव यांनी प्रवेशकर्ती मुले, पालकांचे शाळांमध्ये गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.
मराठी शाळांमधून पालक, मुलांचा ओढा इंग्रजी शाळांकडे असताना कल्याण डोंबिवली पालिकेच्या मराठी शाळांमध्ये एकाचवेळी ४०३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पालिका शिक्षण विभागाने घेतलेल्या मेहनतीमुळे हे प्रवेश झाल्याचे समजते. कल्याण डोंबिवली पालिकेच्या शाळा उत्तम दर्जाच्या असून, तेथेही उत्तम शिक्षण दिले जाते हा संदेश नागरिकांपर्यंत पोहचविण्यात शिक्षण विभागाचे उपायुक्त संजय जाधव, शिक्षणाधिकारी विजय सरकटे यशस्वी झाले आहेत. उपायुक्त जाधव यांनी पालिकेच्या ६१ शाळांचा कायापालट करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या माध्यमातून शाळांची दुरुस्ती, शाळा परिसर स्वच्छ ठेवणे आणि शाळामची पटसंख्या वाढविण्यावर भर देण्यात येत आहे.
पालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाबरोबर त्यांना अत्यावश्यक शैक्षणिक साधने, सुविधा देण्यावर भर देण्यात येत आहे. पालिका नियंत्रित बालवाड्यांचे बळकटीकरण केले जात आहे. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी पालिका शाळा परिसरात फिरून पालकांशी संवाद साधून आपल्या मुलांना पालिका शाळेत प्रवेश घ्यावा यासाठी मागणी केली. पालिका शाळांमधील शिक्षण, सुरक्षितता याविषयी माहिती दिल्यानंतर अनेक पालकांनी आपल्या मुलाला पालिकेत शाळेत प्रवेश घेण्याची तयारी दर्शवली. पालिकेच्या ६१ शाळांमध्ये ५१३ सीसीटीव्ही कॅमेरे अलीकडेच विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांच्या पुढाकाराने बसविण्याचे काम पूर्ण करण्यात आले.
डोंबिवलीतील पाथर्ली येथील पालिका शाळेत, कल्याणमधील उंबर्डे येथील पालिका शाळेत विद्यार्थ्यांना शाळा प्रवेश आणि पटनोंदणीचा कार्यक्रम आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या कार्यक्रमांना माजी नगरसेवक तात्या माने, जयवंत भोईर, शिक्षणाधिकारी विजय सरकटे, कार्यक्रम अधिकारी अर्चना जाधव, उप अभियंता गजानन पाटील, शिक्षण, पालक उपस्थित होते.
कल्याण डोंबिवली पालिकेच्या शाळा सर्वप्रकारच्या शैक्षणिक सोयीसुविधांनी युक्त आहेत. शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आले आहे. दर्जेदार शिक्षण पालिका शाळेत दिले जाते हे पालकांच्या मनावर बिंबवण्यात शिक्षण विभाग यशस्वी झाला. त्यामुळे हे प्रवेश झाले. येत्या दोन महिन्यात ही प्रवेश संख्या वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. – संजय जाधव, उपायुक्त, शिक्षण विभाग.