डोंबिवली : कल्याण-डोंबिवली शहर आणि ग्रामीण भागात एकूण४४ हजार १०० गणेशमूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे आहे. २९३ सार्वजनिक, ४३ हजार ८०७ घरगुती गणपतींचा यामध्ये समावेश आहे. गणेशोत्सव काळात शहरात कायदा, शांतता राहावी म्हणून पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. कल्याण-डोंबिवली शहर आणि ग्रामीणमध्ये एकूण ८ पोलिस ठाणी आहेत. गौरीच्या २ हजार ७२५ मूर्तीची स्थापना होणार आहे. विसर्जन मिरवणुकीवर पोलिसांची नजर असणार आहे.     

दीड दिवसांच्या १३ हजार १७० गणेश मुर्तींचे विसर्जन होईल. पाचव्या दिवशी सार्वजनिक २४ आणि घरगुती ७ हजार ३३५ गणेश मुर्तीचे विसर्जन होईल. सहाव्या दिवशी सार्वजनिक ७ आणि घरगुती १ हजार २७० गणेश मुर्तीचे विसर्जन होईल. सातव्या दिवशी गौरी-गणपतीचे विसर्जन आहे. सार्वजनिक ५३ आणि १० हजार घरगुती गणेश मुर्तीचे विसर्जन होईल. नवव्या दिवशी कल्याण मधील मेळा संघाच्या गणपतींचे विसर्जन होणार आहे. या दिवशी सार्वजनिक ३४ आणि घरगुती १ हजार ७७५ गणेश मुर्तीचे विसर्जन होणार आहे. अंनत चतुर्थीच्या दहाव्या दिवशी १७२ सार्वजनिक आणि घरगुती १० हजार ५५० गणेशमुर्तीचे विसर्जन होणार आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

 पालिकेचे नियोजन

गणेशोत्सवासाठी पालिका प्रशासन सज्ज झाले आहे. कल्याण-डोंबिवलीतील गणपती विसर्जनस्थळी व गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावरील चौकांमध्ये सुरक्षेसाठी २३ महत्त्वाच्या ठिकाणी १०९ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. महापालिका क्षेत्रात ६८ विसर्जन घाटांवर एकूण ६८ जनरेटर, २ हजार ९०० हॅलोजन व ८० लायटिंग टॉवर्स उभारले आहेत.

विसर्जन ठिकाणे

कल्याणमध्ये २७ विसर्जनस्थळे आहेत. त्यापैकी पूर्वेतील गावदेवी मंदिर तिसगाव, चिंचपाडा रोड, कोळसेवाडी पोलिस ठाण्याजवळ, पश्चिमेत मुंबई विद्यापीठ उपकेंद्र अशा चार ठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली आहे. डोंबिवली परिसरात ३७ विसर्जनस्थळे आहेत. त्यात पूर्वेतील पंचायत विहीर, नेहरू मैदान, अयोध्यानगरी, शिवम हॉस्पिटल, टिळक विद्यामंदिर शाळा, प्रगती कॉलेज, कस्तुरी प्लाझा, न्यू आयरे रोड, उदंचन केंद्र, तर पश्चिम येथील आनंदनगर सम्राट चौक, भागशाळा मैदान येथे घरगुती गणेश विसर्जनाकरिता कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक विसर्जन घाटावर अग्निशमन स्वयंसेवक, जीवरक्षक, लाईफ जॅकेट व बोटी अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

Story img Loader