ठाणे, कळवा तसेच मुंब्रा या तिन्ही शहरातील नागरिकांच्या मालमत्ता करातील विलंब आणि प्रशासकीय आकारामध्ये तब्बल ५० टक्के सवलत देण्याचा धोरणात्मक निर्णय शनिवारच्या सर्वसाधारण सभेत एकमताने घेण्यात आला. या निर्णयानुसार येत्या १० मार्चपर्यंत मागील थकबाकीसह चालु वर्षांतील मालमत्ता कराचा भारणा करणाऱ्या मालमत्ताधारकांना ही सवलत मिळणार आहे. याशिवाय, अभय योजनेतील मालमत्ताधारकांना पुढच्या वर्षांचा मालमत्ता कर पहिल्या तिमाहीत भरणे बंधनकारक करण्यात आले आहे, मात्र या कराचा भारणा केला नाहीतर संबंधित मालमत्ताधारकांकडून प्रशासकीय आकाराची रक्कम व्याजासह वसुल करण्यात येणार आहे.
ठाणे महापालिका शहरातील नागरिकांकडून मालमत्ता कराची वसुली करते, मात्र अनेक मालमत्ता धारकांकडून कर थकविण्यात येतो. मालमत्ताधारकांकडून कराची वसुली व्हावी म्हणून त्यांच्या मालमत्ता करातील विलंब आणि प्रशासकीय आकारामध्ये तब्बल ५० टक्के सवलत देण्याचा धोरणात्मक निर्णय शनिवारच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. या निर्णयानुसार ज्या मालमत्ताधारकांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, त्यांनी मालमत्ता कराची संपूर्ण थकबाकी, चालू वर्षांचा मालमत्ता कर आणि सवलतीनंतरच्या विलंब आकारासह एकूण रक्कम १० मार्चपर्यंत भरणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे अभय योजनेत सहभागी झालेल्या मालमत्ताधारकांना पुढच्या वर्षांचा मालमत्ता कर पहिल्या तिमाहीत भरणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे या मालमत्ताधारकांनी कराचा भारणा केला नाहीतर संबंधित मालमत्ताधारकांकडून प्रशासकीय आकाराची रक्कम व्याजासह थकबाकी म्हणून मालमत्ता कराच्या बिलामध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे.

पाणी बिलावरील विलंब शुल्कातही ५० टक्के सवलत
ठाणे शहरातील पाणीपट्टीधारकांच्या बिलावरील विलंब शुल्कास ५०% सवलत देण्याचा निर्णय महापालिकेच्या वतीने घेण्यात आला आहे. ही सवलत १० मार्च २०१६ पर्यत लागू असल्याचे महापालिकेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. ज्या पाणीपट्टीधारकांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी पाणीपट्टी कराची संपूर्ण थकबाकी, चालु वर्षांची पाणीपट्टी आणि सवलतीनंतरच्या विलंब आकारासह एकुण बिलाची रक्कम १० मार्चपर्यत भरणे आवश्यक आहे. या अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी पाणीपट्टीधारकांना सन २०१६-१७ या वर्षांचा संपूर्ण पाणीपट्टी कर पहिल्या सहा महिन्यात भरणे बंधनकारक आहे.