मीरा-भाईंदर महापालिकेच्या हद्दीतील मुंबई-अहमदाबाद महामार्गालगतचे दहिसर चेकानाका ते घोडबंदपर्यंतचे सुमारे ५१ बार १ एप्रिलपासून बंद झाले आहेत. एरवी सूर्य मावळल्यानंतर गजबजणारा दहिसर चेकनाक्याचा परिसर बंदीनंतर आता सुनासुना झाला आहे.

महामार्गालगत ५०० मीटर परिसरापर्यंत मद्यविक्रीस बंदी घालण्याच्या १५ डिसेंबरच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच शिक्कामोर्तब केले. यामुळे महापालिका हद्दीतील महामार्गालगतचे ५१ परमीट रूम, ४ देशी दारूचे बार आणि २ दारूविक्रीच्या दुकानांना टाळे लागली आहेत. या बार व दुकानातून मद्य दिले जात नाही यावर उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांची तिक्ष्ण नजर असणार आहे. बंद झालेल्या बारच्या परवान्याची मुदत ३१ मार्चला संपुष्टात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आता परवान्यांचे नूतनीकरण होणार नसल्याने बारमालकांना बार बंद करण्याशिवाय अन्य पर्यायच शिल्लक राहिलेला नाही. यातील बहुतांश बार हे ऑर्केस्ट्रा बार असल्याने त्यातील दणदणाट बारबंदीमुळे थांबला असून परिसरात शुकशुकाट झाला आहे.

ऑर्केस्ट्रा बार हे डान्स बारचेच दुसरे रूप होते. डान्स बारमधून चालणारी अश्लीलता, त्यातून वाढणारी गुन्हेगारी यावर नियंत्रण आणण्यासाठी शासनाकडून डान्स बारवर बंदी घालण्यात आली आणि त्याजागी अटी-शर्तीची बंधने घालत ऑर्केस्ट्रा बारना परवानगी देण्यात आली; परंतु बारमालकांनी या अटी-शर्तीमधून अनेक पळवाटा शोधून काढल्याने ऑर्केस्ट्रा-बारही अनैतिक व्यवसायांचे अड्डे बनले होते. दहिसर चेकनाका हा मुंबईचे प्रवेशद्वार असल्याने इथल्या ऑर्केस्ट्रा बारमधून कायम गजबजाट असायचा. हे बार म्हणजे पोलिसांची डोकेदुखी बनले होते. यातील अनेक बारचे परवाने रद्द करावेत असे प्रस्ताव पोलिसांकडून महसूल विभागाकडे पाठविण्यात आले होते, परंतु त्यावर कारवाई होत नव्हती. आता न्यायालयाच्या निर्णयामुळे बार आपसूकच बंद झाल्याने पोलिसांनी मोठा नि:श्वास सोडला आहे.

बारमालकांची शहराकडे धाव

महामार्गालगत बारवर बंदी आल्याने बारमालकांनी आता शहराच्या आतल्या परिसराकडे धाव घेण्यास सुरुवात केली आहे. महामार्गापासून दूर असलेल्या अनेक व्यावसायिक मालमत्तांना यामुळे मागणी आली असून त्यांचे दरही वाढण्यास सुरुवात झाली आहे. मीरा रोड येथील कनाकिया, इंद्रलोक या नव्याने वसत असलेल्या परिसरात बारमालकांनी चौकशी सुरू केल्याने महामार्गालगत बंद झालेली बार संस्कृती आता शहरात बोकाळणार की काय, अशी भीती रहिवाशांना वाटू लागली आहे.