उपनगरीय रेल्वेसेवा शहरासाठी जीवनवाहिनी समजली जात असली तरी अनेक वेळा ती निष्पाप प्रवाशांसाठी प्राणघातकही ठरू लागली आहे. मध्य रेल्वे मार्गावरील सर्वाधिक गर्दीची स्थानके असणाऱ्या ठाण्यापल्याडच्या स्थानकांमध्ये गेल्या वर्षभरात सुमारे ९६८ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर ८६० जण गंभीर दुखापत होऊन कायमचे अंथरुणाला खिळले आहेत.
tv10रेल्वे प्रशासनाच्या वतीने रेल्वे रूळ ओलांडून नका, अशी जनजागृती होत असली तरी रेल्वे रुळांना संरक्षण भिंत नसल्याने रेल्वे रूळ ओलांडताना होणाऱ्या अपघातांची संख्या सर्वाधिक असून वर्षभरात झालेल्या ६५३ अपघातांमध्ये ५४१ जणांनी प्राण गमवावे असल्याची धक्कादायक माहिती उपलब्ध झाली आहे. ठाण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते सुयश प्रधान यांनी मागवलेल्या माहितीवरून ही बाब स्पष्ट झाली आहे.
मध्य रेल्वेचा ठाण्यापलीकडचा रेल्वेमार्ग हा निवासी भागाच्या मध्यातून गेला आहे. अनेक ठिकाणी रेल्वे रुळांच्या दोन्ही बाजूंनी झोपडय़ांचे अतिक्रमण मोठय़ा प्रमाणात झाले आहे. या भागातून धावणाऱ्या लोकल आणि मेलगाडय़ांमुळे अपघाताची शक्यता दिसत असतानाही रेल्वे रूळ ओलांडणाऱ्यांची संख्या कायमच वाढताना दिसते. रेल्वेच्या वतीने रेल्वे रूळ ओलांडू नये यासाठी वारंवार जनजागृती केली जात असली तरी पुरेसे पादचारी पूल आणि सब-वे नसल्याने या नागरिकांना रेल्वे रूळ ओलांडण्यावाचून पर्यायच उपलब्ध होत नाही. रेल्वे प्रशासनाच्या वतीने रेल्वे रुळांच्या संरक्षण भिंतीचे काम अनेक वर्षांपासून सुरू असले तरी त्या कामाचे ५० टक्के काम आजमितीस पूर्ण झालेले नाही. यामुळे रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत असून रेल्वे आणि नागरिकांच्या बेपर्वाईमुळे अपघातांची संख्याही वाढू लागली आहे. रूळ ओलांडताना ठाणे स्थानक परिसरात झालेल्या अपघातांमध्ये १०१ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये ८४ पुरुष आणि १७ महिलांचा समावेश आहे. दिवा स्थानकात ५९ बळी गेले असून त्यामध्ये ५१ पुरुष आणि ८ महिलांचा समावेश आहे. कोपर स्थानकात ४३ तर ठाकुर्ली स्थानकात ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. कल्याणमध्ये ३९ जणांचा मृत्यू झाला असून अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही स्थानकांत प्रत्येकी ३२ जण मृत्यूने गाठले आहे. खांबास धडकून मृत्यू झाल्याची तीन जणांची नोंद कल्याण स्थानकात आहे. तर पोकळीमध्ये पडून एक जणाचा कल्याण स्थानकात मृत्यू झाल्याची बाब सुयश प्रधान यांनी पुढे आणली आहे.
श्रीकांत सावंत, ठाणे

बेपर्वाई रेल्वेचीच
रूळ ओलांडताना होणारे अपघात हे रेल्वेच्याच बेपर्वाईचा प्रकार आहे. रेल्वे प्रशासनाच्या वतीने दहा वर्षांपूर्वीपासून सुरू असलेल्या संरक्षण भिंतीचे काम आजही अपूर्ण अवस्थेत आहेत. वन खाते अभयारण्यांच्या सुरक्षासाठी मोठय़ा संरक्षण िभती बांधत असतात. तर हायवे अथॉरिटीही संरक्षण िभती बांधून पूर्ण करू शकतात, तर रेल्वे प्रशासनाला हे शक्य का नाही. संरक्षण भिंती बांधून पूर्ण झाल्यास व आवश्यक ठिकाणी रेल्वे पादचारी पूल आणि सब-वेची व्यवस्था केल्यास रूळ ओलांडणाऱ्यांची संख्या निश्चितच कमी होऊ शकले, असे मत रेल्वे प्रवासी महासंघाचे मधू कोटियन यांनी व्यक्त केले.