दुय्यम निबंधक कार्यालायात विवाह नोंदणीत वाढ

ठाणे : करोना संसर्गामुळे सार्वजानिक कार्यक्रमांवर बंधने आल्यामुळे यंदा जिल्ह्यातील अनेकांनी नोंदणीकृत पद्धतीने विवाह हा मार्ग अवलंबला आहे. त्यामुळे ठाणे दुय्यम निबंधक नोंदणी कार्यालयात विवाह नोंदणीसाठी गर्दी वाढल्याचे पाहायला मिळत आहे. मार्च, मे, जून आणि जुलै या चार महिन्यांत या कार्यालयात एकूण ५५६ विवाहांची नोंदणी झाल्याची माहिती समोर आली आहे. यंदा करोनामुळे जिल्ह्यातील विवाह नोंदणीचे हे प्रमाण ४० टक्क्यांनी वाढल्याचे आकडय़ांवरून दिसून येत आहे.

राज्यात मार्च महिन्यापासून करोनाचा संसर्ग वाढू लागल्यामुळे सार्वजानिक कार्यक्रमावर मोठय़ा प्रमाणात निर्बंध आले. त्यामुळे मार्च, एप्रिल आणि मे महिन्यातील विवाहाचे मुहूर्त चुकले असून अनेक विवाह रद्द झाले आहेत. तसेच करोनाकाळात विवाह सोहळा केवळ ५० माणसांच्या उपस्थितीत साजरा करावा, असे आवाहन राज्य सरकारतर्फे करण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या चार महिन्यांपासून ठाणे जिल्ह्यातील अनेक जोडप्यांनी साध्या पद्धतीने विवाह करण्याचा मार्ग निवडला आहे. याच कारणाने गेल्या चार महिन्यांपासून ठाणे दुय्यम निबंधक नोंदणी कार्यालयात विवाह नोंदणीचे प्रमाण वाढले आहे.

नोंदणीकृत पद्धतीने विवाह करायचा असल्यास दुय्यम निबंधक कार्यालयात दोन ते तीन महिने आधी नोंदणी करण्यात येत असते. मात्र, यंदा करोनामुळे मार्च महिन्याच्या २२ तारखेपासून ते संपूर्ण एप्रिल महिना आणि मे महिन्यातील १५ दिवस असे सुमारे ५० ते ५५ दिवस कार्यालय बंद ठेवण्यात आले होते. या कालावधीत अनेक विवाह इच्छुकांचा साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेचा मुहूर्त हुकल्याने हिरमोड झाला. असे असले तरी, मार्च महिन्याच्या १ मार्च ते २१ मार्चपर्यंत ३४१ जणांनी विवाह करण्यासाठी अर्ज केले होते. त्यापैकी २५७ जोडपी विवाह बंधनात अडकली आहेत. त्यानंतर २२ मार्च ते १४ मे दरम्यान बंद असलेले विवाह नोदंणी कार्यालय टाळेबंदीत शिथिलता आल्याने १५ मेपासून सुरू झाले.

त्यामुळे १५ मेपासून जून आणि जुलै या तीन महिन्यांच्या कालावधीत ५१६ जणांनी विवाहासाठी नोंदणी केली होती. त्यापैकी २९९ जोडप्यांनी विवाहाची नोंदणी केल्याची माहिती दुय्यम निबंधक कार्यालयातर्फे देण्यात आली आहे. नोंदणीकृत विवाहांची संख्या मात्र वाढल्याचे दिसून येत आहे.