scorecardresearch

कल्याणमध्ये मेडिकल दुकान सुरू करण्याच्या नावाने ५६ लाखांची फसवणूक

जानेवारी २०२१ ते मे २०२१ या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे. कल्याण पूर्व भागातील आडिवली ढोकळी गाव भागात रुग्णालय सुरु करणार असल्याचे सांगत फससवणूक केल्याचे समोर आले आहे.

कल्याणमध्ये मेडिकल दुकान सुरू करण्याच्या नावाने ५६ लाखांची फसवणूक
कल्याणमध्ये ५६ लाखांची फसवणूक (प्रातिनिधिक छायाचित्र)

कल्याण पूर्व भागातील आडिवली-ढोकळी या बेकायदा बांधकामांचे आगर असलेल्या भागात अंजली रुग्णालय सुरू करत आहोत. या रुग्णालयात औषध दुकान, आरोग्य तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी गुंतवणूकदारांनी ५६ लाख रुपये नवी मुंबईतील एका वैद्यकीय व्यवसायातील व्यावसायिकाकडून घेतले. त्यानंतर दोन वर्षाच्या कालावधीत रुग्णालय नाहीच, पण औषध दुकान, प्रयोगशाळा सुरू न करता घेतलेले पैसे परत न करता व्यावसायिकाची ५६ लाख रुपयांची तीन जणांनी फसवणूक केली आहे.

हेही वाचा- कल्याणमध्ये आजपासून आगरी-कोळी, मालवणी महोत्सव

वगताराम लादाराम भाटी (४३, रा. घणसोली, नवी मुंबई) असे तक्रारदाराचे नाव आहे. कल्पना देबशेखर भौमिक, भीमकुमार साव उर्फ अमित सावरा (रा. ब्राईट रेसिडेन्सी, काकाचे ढाब्याजवळ, मलंगगड रोड, कल्याण पूर्व), नीलेश नवनाथ कळसाईत (रा. नारायण हरी निवास, कशेळी, भिवंडी रस्ता) अशी आरोपींची नावे आहेत. भौमिक हा मूळ कोलकत्ता नदियाजिली येथील रहिवासी आहे.

हेही वाचा- गुटगुटीत बालके डोंबिवलीतील सुदृढ बालक स्पर्धेत यशस्वी

जानेवारी २०२१ ते मे २०२१ या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे. मानपाडा पोलीस ठाण्यात वगताराम यांनी तक्रार केली आहे.
पोलिसांनी सांगितले, आरोपी कल्पना, अमित, नीलेश यांनी संगनमत करुन कल्याण पूर्व भागातील आडिवली ढोकळी गाव भागात अंजली रुग्णालय सुरू करणार आहोत असा बनाव रचला. या रुग्णालयात औषध विक्री दुकान सुरू करणे, आरोग्य तपासणी प्रयोगशाळा सुरू करायची आहे म्हणून त्यासाठी गुंतवणूकदार पाहण्यास सुरूवात केली. आरोपींनी तक्रारदार वगताराम आणि त्यांचा व्यावसायिक भागीदार धनाराम सोळंकी यांच्याकडून ३० लाख रुपये धनादेशाव्दारे स्वीकारले आणि दोन लाख रुपये रुग्णालयामधील साहित्य खरेदीसाठी घेतले. तसेच, साक्षीदार समीक्षा संतोष पालव व त्यांच्या आरोग्य हेल्थ केअर कंपनीच्या भागीदारांकडून अंजली रुग्णालयात प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी २४ लाख रुपये स्वीकारले. अशी एकूण ५६ लाख रुपयांची रक्कम जमा केल्यानंतर काही दिवसात रुग्णालय सुरू होणे आवश्यक होते.

हेही वाचा- ठाणे : दिव्यांग निधीचे तत्काळ वाटप करा अन्यथा फेब्रुवारीपासून रस्त्यावर उतरु, अखिल भारतीय दिव्यांग सेनेचा इशारा

अंजली रुग्णालय आपण सुरू केले आहे. त्याला रुग्णांचा चांगला प्रतिसाद मिळत नाही. केलेला खर्च वसुल होत नाही. त्यामुळे अंजली रुग्णालय बंद करत आहोत असे तक्रारदार, साक्षीदार यांना आरोपींनी सांगितले. त्यानंतर पैसे परत देण्याचे आश्वासन आरोपींनी दिले होते. परंतु आता दोन वर्ष उलटली तरी आरोपींकडून ठेव म्हणून घेतलेले पैसे परत केले जात नाहीत. टाळाटाळ केली जात आहे हे लक्षात आल्यावर आपली फसवणूक आरोपींनी केली आहे. तक्रारदाराने मानपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक डी. ए. सूर्यंवंशी तपास करत आहेत.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-01-2023 at 15:44 IST

संबंधित बातम्या