वसई-विरारमध्ये २२ लाख लोकसंख्येमागे अवघे ५६ वाहतूक पोलीस; वाहतूक नियोजनाचा आराखडाही कागदावरच

वसई-विरार शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न जटिल झाला असून २२ लाख लोकसंख्येचा भार अवघ्या ५६ वाहतूक पोलिसांवर आहे. ट्रॅफिक वॉर्डनची (वाहतूक अभिरक्षक) कमतरता, अपुरे वाहतूक संकेत दिवे (सिग्नल), वाहनतळांची कमतरता आणि बेसुमार वाढलेल्या वाहनांमुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. वाहतूक नियोजनाचा आराखडाही केवळ कागदावरच असून वाहतूक कोंडीवर काहीच उपाययोजना नाहीत का, असा सवाल सामान्य जनता विचारत आहेत.

वसई-विरार शहराची लोकसंख्या सध्या २२ लाखांहून अधिक झालेली आहे. शासकीय जनगणनेनुसार शहरातील लोकसंख्या १४ लाख एवढी कागदोपत्री आहे. शहरात सध्या अडीच लाखांहून अधिक वाहने आहेत, मात्र वाहतूक पोलीस अवघे ५६ एवढे आहेत. ही १४ लाख लोकसंख्या गृहीत धरली तर सध्या २३ हजार लोकसंख्येमागे १ पोलीस, तर साडेचार हजार लोकसंख्येमागे एक वाहतूक पोलीस असे प्रमाण आहे. ३८० चौरस किलोमीटर एवढय़ा विस्तीर्ण क्षेत्रात या वाहतूक पोलिसांना वाहतुकीचे नियमन करावे लागत आहे. वाहतूक पोलिसांची ही संख्या अत्यंत कमी असून त्याचा परिणाम कामावर होत असल्याची कबुली पालघरचे पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांनी दिली. महापालिकेने वाहतूक पोलिसांच्या मदतीला १५० ट्रॅफिक वॉर्डन (वाहतूक अभिरक्षक) दिलेले आहेत. पोलिसांनी आणखी १०० वाहतूक अभिरक्षकांची मागणी केलेली आहे, परंतु महापालिकेने आणखी २५ देण्याची तयारी दर्शवली आहे.

सध्या शहरात १६ ठिकाणी वाहतूक संकेत दिवे (सिग्नल) कार्यरत आहेत. आणखी २१ ठिकाणी वाहतूक संकेत दिवे बसविण्याची मागणी पोलिसांनी पालिकेकडे केली आहे. मागील पोलीस अधीक्षकांनी पालिकेला सादर केलेला वाहतूक आराखडाही रखडला आहे. त्यात अनेक ठिकाणी वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी एकदिशा मार्ग तयार करण्याचे नमूद करण्यात आलेले होते. वाहन पार्किंगची मोठी समस्या निर्माण झाली असून वाहनतळ उभारण्याच्या सूचनाही केलेल्या होत्या. त्यासाठी शहरातील अनेक ठिकाणांचे सव्‍‌र्हेक्षणही करण्यात आलेले आहे. परंतु या आराखडय़ातील सूचनांवर काहीच उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याने हा आराखाडा केवळ कागदावरच राहिला.

वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी नुकतीच स्थानिक आमदारांनी एक बैठकही बोलावली होती. त्यानुसार रस्त्यावर अतिक्रमण करणारी वाहने तात्काळ हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रस्त्यावरील वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणारी अतिक्रमण हटवणे, रस्त्याच्या आड येणारी रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) काढून टाकण्याच्या सूचना महावितणाला देण्यात आल्या आहेत.

 

आम्ही वाहतूक पोलिसांची संख्या वाढवणार आहोत, परंतु लोकसंख्या वाढत असल्याने तेही अपुरे पडणार आहेत. त्यामुळे महापालिकेने अतिरिक्त ट्रॅफिक वॉर्डन दिले तर ते खूप फायदेशीर ठरेल. वाहतूक नियोजनावर तज्ज्ञांकडून आराखडा तयार करण्यात आला असून त्यावर काम सुरू आहे.

– मंजुनाथ सिंगे, पालघरचे पोलीस अधीक्षक