डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील सागर्ली गावात एका बेकायदा इमारतीला उद्वाहनाची सुविधा देण्यासाठी खोदण्यात आलेल्या पाण्याने भरलेल्या खड्डय़ात पडून एका सहा वर्षांचा मुलाचा मृत्यू झाला.

वेदांत हनुमंत जाधव (६) असे मृत मुलाचे नाव आहे. तो सागर्लीमधील विघ्नहर्ता इमारतीत तळमजल्याला आजी, आजोबा आणि वडिलांसोबत राहत होता. वेदांत एक वर्षांचा असताना आईला तो पारखा झाला होता. त्याचा सांभाळ आजी, आजोबा करत होते. मंगळवारी सकाळी वेदांत नेहमीप्रमाणे खेळण्यासाठी बाहेर गेला. तो दुपारी भोजनासाठी परत आला नाही, म्हणून त्याच्या आजी, आजोबांनी शोधाशोध केली. तो कुठेच आढळला नाही. मित्रांनीही वेदांतला आम्ही पाहिले नाही, असे सांगितले.

परिसरातील रहिवाशांनी वेदांतचा शोध सुरू केला. रहिवाशांनी तो राहत असलेल्या इमारतीच्या शेजारी तपास केला. इमारतीशेजारी एका बेकायदा इमारतीला उद्वाहन सुविधा देण्यासाठी माफियाने खोल खड्डा खणून ठेवला होता. त्या पाण्याने भरलेल्या खड्डय़ात तो पडला होता. त्याला बाहेर काढून तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. वेदांतचे वडील खासगी सफाई कामगार आहेत.