Premium

सनई-चौघडे, वाजंत्री बहु गलबला… शुभमंगल सावधान! तुळशी विवाहानंतर लग्नाचे सर्वाधिक ६३ मुहूर्त; सभागृहांची आगाऊ नोंदणी

मागील वर्षी तुळशी विवाहानंतर म्हणजेच नोव्हेंबर २०२२ ते जून २०२३ पर्यंत ५५ लग्नाचे मुहूर्त होते.

63 wedding muhurta tulsi vivah, Advance registration of halls
सनई-चौघडे, वाजंत्री बहु गलबला…. शुभमंगल सावधान! तुळशी विवाहानंतर लग्नाचे सर्वाधिक ६३ मुहूर्त; सभागृहांची आगाऊ नोंदणी (संग्रहित छायाचित्र)

ठाणे: यंदा तुळशी विवाहानंतर लग्नाचे सर्वाधिक म्हणजेच ६३ मुहूर्त असून ते पुढील वर्षाच्या जुलै महिन्यापर्यंतचे आहेत. त्यातही नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यात सर्वाधिक मुहूर्त आहेत. गेल्यावर्षी ५५ मुहूर्त होते. यंदा आठ मुहूर्त जास्त आहेत. यामुळे लग्न ठरलेल्या वर आणि वधूच्या कुटूंबियांनी सभागृहांची विवाहासाठी आगाऊ नोंदणी करण्यास सुरूवात केली आहे. यंदा तुळशी विवाहानंतर जास्त मुहूर्त असल्याने सनई-चौघडे मोठ्याप्रमाणात वाजणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिवाळी संपल्यावर तुळशीच्या लग्नाचे वेध लागतात. तुळशी विवाह पार पडल्यानंतर विवाह इच्छुकांना विवाह करण्यासाठी उत्तम कालावधी असतो. याकालावधीत विवाह मुहूर्त पाहून लग्नाची तारिख ठरवली जाते. मागील वर्षी तुळशी विवाहानंतर म्हणजेच नोव्हेंबर २०२२ ते जून २०२३ पर्यंत ५५ लग्नाचे मुहूर्त होते. तर, यंदाच्या वर्षी जुलै ते ऑक्टोबर हा कालावधी चातुर्मासाचा असल्यामुळे या महिन्यात मुहूर्त नव्हते. त्यात, यंदा श्रावण अधिकमास होता. त्यामुळे चातुर्मास पाच महिन्यांचा झाला होता. म्हणून यंदा तुळशी विवाहारंभ १९ दिवस उशिरा आला असल्याची माहिती दा.कृ.सोमण यांनी दिली. यंदा विवाहाचा कालावधी लांबला असला तरी तुळशी विवाहानंतर सर्वाधिक लग्नाचे मुहूर्त आहेत.

हेही वाचा… ठाणे स्थानकात रेल्वे रूळ ओलांडण्याचे प्रकार सुरूच; गेल्या ११ महिन्यात एक हजाराहून अधिक प्रवाशांवर दंडात्मक कारवाई

यंदाच्या वर्षी तुळशी विवाहानंतर अवघ्या तीन दिवसातच लग्नाचा पहिला मुहूर्त आल्याचे पाहायला मिळत आहे. २८ नोव्हेंबरपासून विवाहाचे मुहूर्त सुरु झाले आहेत. नोव्हेंबर २०२३ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत विवाह मुहूर्तांची संख्या जास्त आहे. त्यातही, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात तब्बल १२ मुहूर्त आहेत. तसेच गुरू ग्रहाचा अस्त ६ मे २०२४ ते २५ जून २०२४ आहे. तर, शुक्र ग्रहाचा अस्त ८ मे ते १ जून २०२४ आहे. त्यामुळे मे आणि जून महिन्यात विवाह मुहूर्त प्रत्येकी दोनच आहेत. विवाह तारखेच्या चार ते पाच महिन्या आधिपासून विवाह कार्यालयात नोंद केली जाते. यंदाही नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंतच्या विवाहाची नोंद विवाह कार्यालयात करण्यात येत आहे.

विवाह इच्छुकांना यंदा तुळशी विवाहानंतर विवाह करण्यासाठी भरपूर विवाहमुहूर्त आहेत. त्यामुळे खानपान व्यवसाय, मंडप, वाजंत्री आणि पुरोहित यांना भरपूर काम मिळणार आहे. – दा.कृ.सोमण, पंचांगकर्ते.

करोना काळात या क्षेत्राला प्रचंड फटका बसला होता. २०२२ नंतर काही प्रमाणात आर्थिक घडी रुळावर येण्यास सुरुवात झाली आहे. परंतू, यंदाच्या वर्षी आलेल्या सर्वाधिक विवाह मुहूर्तांमुळे या क्षेत्राला पुन्हा झळाली मिळणार आहे. विवाह कार्यालयांमध्ये नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंतच्या नोंदणी झाल्या आहेत. – कार्तिक शहा, संचालक

यंदाचे विवाह मुहूर्त (नोव्हेंबर २०२३ ते जूलै २०२४ पर्यंत)

महिनादिनांक
नोव्हेंबर२८, २९
डिसेंबर६, ७, ८, १५, १७, २०, २१, २५, ३१
जानेवारी२, ३, ४, ५, ६, ८,१७,२२, २७, २८, ३०, ३१
फेब्रुवारी१, २, ४, ६, १२, १३, १७, १८, २४, २६, २८, २९
मार्च३, ४, ६, १६, १७, २६,२७,३०
एप्रिल१, ३, ४, ५, १८, २०, २१, २२, २६,२८
मे१ , २
जून२९, ३०
जुलै९, ११, १२, १३, १४, १५

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 63 wedding muhurta after tulsi vivah advance registration of halls dvr

First published on: 29-11-2023 at 15:46 IST

आजचा ई-पेपर : ठाणे

वाचा