ठाणे : दहीहंडी उत्सवादरम्यान शुक्रवारी ठाणे शहरात ६४ गोविंदा जखमी झाले. यापैकी ५२ जणांवर घटनास्थळी प्राथमिक उपचार करण्यात आले. तर, जिल्हा शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर दोघांना घरी सोडण्यात आले. इतर १० जणांवर रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. दहीहंडी उत्सवादरम्यान ठाणे शहरात शुक्रवारी ६४ गोविंदा जखमी झाले, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. जखमी गोविंदांपैकी ५२ जणांवर घटनास्थळी प्राथमिक उपचार करण्यात आले, अशी माहिती देण्यात आली.

वडाळा येथील सूरज पारकर (३८) हा गोविंदा तीनहात नाका येथे दुचाकीवरून पडून जखमी झाला. तर, प्रथमेश दुरगाले (२८) याच्या डाव्या डोळय़ाला किरकोळ दुखापत झाली होती. या दोघांवर ठाणे जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.

गोविंदा पथकातील संतोष शिंदे (५२) हे प्रभात सिनेमाजवळ दहीहंडीचे थर लावताना बेशुद्ध पडले होते. त्यांच्यावर कौशल्य रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर, ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नऊ जणांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यापैकी बहुतेक जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले.

विलेपार्ले येथे दहीहंडी आयोजकांविरोधात गुन्हा

मुंबई: विलेपार्ले पूर्व येथे दहीहंडी आयोजनात थर लावत असताना वरून पडून दोन गोविंदा जखमी झाल्याप्रकरणी पोलिसांनी आयोजकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आयोजनात सुरक्षेच्या दृष्टीने विशेष उपाययोजना करण्यात न आल्यामुळे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. जखमी गोविंदांवर उपचार सुरू असून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

आयोजक रियाज मस्तान शेख (३६) याच्याविरोधात विलेपार्ले पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तो विलेपार्ले येथील वाल्मीकी नगर येथील रहिवासी आहे. तो राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता असून गोपाळकालानिमित्त शेखने त्यांच्याच परिसरात दहीहंडीचे आयोजन केले होते. त्या वेळी चेंबूरकरवाडी येथील शिवशंभो गोविंदा पथक तेथे दहीहंडीसाठी आले होते. त्यांनी दहीहंडी फोडण्यासाठी थर रचले. त्या वेळी त्यांचे थर कोसळले. त्या वेळी वरून पडल्यामुळे विनय शशिकांत रबाडे आणि संदेश प्रकाश दळवी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे आयोजकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. गोविंदांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना करण्यात आली नव्हती आणि योग्य सुरक्षा न घेतल्यामुळे दोन गोविंदा गंभीर जखमी झाले.