ठाणे : राज्यात सत्तांतर घडवून आणणाऱ्या बंडाळीचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यात शिवसेनेला धक्के बसू लागले आहेत़  ठाणे महापालिकेतील शिवसेनेच्या ६७ पैकी ६६ , तर नवी मुंबई पालिकेतील ३८ पैकी २८ माजी नगरसेवकांनी शिंदे यांना पाठिंबा दिला आह़े

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे महापालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे ६७ नगरसेवक निवडून आले होते. पक्षाने पहिल्यांदाच पालिकेत एकहाती सत्ता मिळवली होती. या नगरसेवकांची पंचवार्षिक मुदत मार्चमध्ये संपुष्टात आली. पालिकेची अद्याप निवडणूक झालेली नाही.  ठाणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो़  एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत भाजपबरोबर नवे सरकार स्थापन केल्याने ठाण्यात शिंदे विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला आहे. ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिंदे यांचे उघडपणे समर्थन करत शहरभर बॅनर लावले होते. तसेच ठाणे महापालिका निवडणूक पावसाळय़ानंतर होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने माजी नगरसेवक काय भूमिका घेणार, याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. शिवसेनेच्या ६७ पैकी ६४ नगरसेवकांनी बुधवारी रात्री मुंबईतील नंदनवन बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. त्यात खासदार राजन विचारे यांच्या पत्नी व माजी नगरसेविका नंदिनी विचारे अनुपस्थितीत होत्या. उर्वरित दोनपैकी एक नगरसेवक वैद्यकीय कारणामुळे, तर दुसरा नगरसेवक अमरनाथ यात्रेला गेल्यामुळे उपस्थित नव्हता. ६७ पैकी ६६ माजी नगरसेवकांनी शिंदे यांचे समर्थन केल्याने ठाणे शहरात शिवसेनेला मोठे खिंडार पडल्याचे चित्र आहे.

दुसरीकडे, नवी मुंबई पालिकेतील शिवसेनेच्या ३८ पैकी २८ माजी नगरसेवकांनी गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नंदनवन येथील निवासस्थानी भेट घेतली. उर्वरित १० पैकी ५ नगरसेवक संपर्कात असून, तेही लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती शिंदे गटातील ज्येष्ठ माजी नगरसेवक शिवराम पाटील यांनी दिली. ऐरोलीतील एम. के. मढवी, विनया मढवी, सानपाडा येथील सोमनाथ वास्कर, कोमल वास्कर, घणसोली येथील द्वारकानाथ भोईर या नगरसेवकांनी मात्र शिंदे गटात सहभागी व्हायचे नाही, असे ठरवल्याचे सूत्रांनी सांगितले.

ठाण्यात सेनेकडे एकच माजी नगरसेवक

ठाण्यात शिवसेनेच्या ६७ पैकी ६६ माजी नगरसेवकांनी शिंदे यांना पाठिंबा दिल्याने सेनेकडे केवळ एकच नगरसेवक आह़े  खासदार राजन विचारे यांच्या पत्नी व माजी नगरसेविका नंदिनी विचारे शिवसेनेबरोबर आहेत़  शिवसेनेने लोकसभेच्या मुख्य प्रतोदपदी राजन विचारे यांची नियुक्ती नुकतीच केली़

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 66 shiv sena corporators in thane 28 former corporators in navi mumbai support eknath shinde zws
First published on: 08-07-2022 at 03:08 IST