६७ वृद्धांना करोना संसर्ग ; खडवली मातोश्री वृद्धाश्रमातील घटना

६२ रुग्णांपैकी ५५ जणांनी करोना लशीच्या दोन्ही मात्रा घेतल्या आहेत.

Corona Virus

कल्याण : मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा रेल्वे मार्गावरील कल्याण तालुक्यातील खडवली येथील भातसा नदी काठच्या मातोश्री वृध्दाश्रमातील ६७ जणांना करोनाची लागण झाली आहे. यातील काही वृध्दांना ताप सदृश्य लक्षणे आहेत, तर काही लक्षणे विरहित आहेत. सर्व वृध्दांना उपचारासाठी ठाणे सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी मााहिती पडघा आरोग्य केंद्रातील अधिकाऱ्याने दिली.

पडघा आरोग्य केंद्राच्या अंतर्गत मौजे सोरगाव येथील मातोश्री वृध्दाश्रम खडवली येथे भातसा नदी काठी आहे. खडवली रेल्वे स्थानकाच्या पश्चिम बाजूला निसर्गरम्य वातावरणात मातोश्री वृध्दाश्रम आहे. विविध भागातील १०९ वृध्द येथे वास्तव्यास आहेत. गेल्या आठवडय़ात एका वृध्दाला ताप आला. वातावरण बदलाचा परिणाम म्हणून त्यांच्यावर नियमित वैद्यकीय उपचार करण्यात आले. उपचार करुनही ताप कमी होत नव्हता. या रुग्णाची खासगी करोना चाचणी केंद्रात तपासणी केली असता, तो रुग्ण करोना सकारात्मक आढळला.

पडघा आरोग्य केंद्राला ही माहिती मिळाली. या केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल भोर यांनी वृध्दाश्रमात करोना चाचणीसाठी शिबीर लावले. वृध्द, त्यांचे नातेवाईक, सेवक अशा १०९ जणांची प्रतिजन चाचणी केली. यामध्ये  ६१ वृध्द करोना बाधित आढळले. २५ महिला, ३७ पुरुष, पाच कर्मचारी, दोन कुटुंबीय यांचा यात समावेश आहे. बाधित ४१ जणांना विविध व्याधी आहेत. ३० रुग्ण लक्षणे विरहित सामान्य आहेत. गरोदर माता, एका बालिकेचा बाधितांमध्ये समावेश आहे. ६२ रुग्णांपैकी ५५ जणांनी करोना लशीच्या दोन्ही मात्रा घेतल्या आहेत. दाखल १५ रुग्णांचे नमुने जनुकीय गुणसूत्र तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत, असे सामान्य रुग्णालयातील अधिकाऱ्याने सांगितले. आठ रुग्ण अतिदक्षता विभाग आणि ५९ सामान्य कक्षात दाखल आहेत.   करोना रुग्णांमुळे ११३० लोकसंख्या असलेल्या सोरगाव गावाला प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहे. येथे घरोघरी आरोग्य केंद्रातर्फे सव्हेक्षण सुरू केले आहे, असे पडघा केंद्रातील अधिकाऱ्याने सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 67 senior citizens of thane old age home test coronavirus positive zws

ताज्या बातम्या