ठाणे तसेच कल्याण परिसरात महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचणाऱ्या सात चोरांच्या ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. या चोरांकडून ठाणे परिसरातील तब्बल ६३ सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून दीड किलो वजनाचे ४१ लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.
सोनसाखळी चोरीच्या तक्रारी पुन्हा वाढू लागल्याने ठाणे पोलिसांनी चोरटय़ांच्या माग काढण्यास सुरुवात केली असून या मोहिमेमध्ये ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे ठाणे युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र डोईफोडे यांच्या पथकाने पाच चोरटय़ांना अटक केली आहे. त्यामध्ये जाफर गुलाम हुसेन जाफरी (रा. आंबिवली, कल्याण), मोहमंद उर्फ मम्मु उर्फ सांगा जाकीर सय्यद (रा. आंबिवली, कल्याण), हुसनैन गुलामरजा सैय्यद (रा. आंबिवली, कल्याण), मेहंदी हुसेन मुस्लिम इराणी (रा. मुंब्रा), अलीरझा हैदरअली जाफरी (रा. मुंब्रा) यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून ३० सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस आले. तसेच ८२९ ग्रॅम वजनाचे २२ लाख रूपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या कल्याण युनिटने मेहंदी युसुफ सैय्यद आणि मजमुल उर्फ जग्गू फैय्याज इराणी (रा. आंबिवली, कल्याण) या चोरांना अटक केली. त्यांच्याकडून ३३ सोनसाखळी चोरीचे उघडकीस आले असून १९ लाख रूपये किमतीचे ७५९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.