डोंबिवली : डोंबिवली जवळील शिळफाटा पलावा येथील एका महिलेशी समाज माध्यमातून मैत्री करुन गेल्या वर्षभराच्या काळात या महिलेचा विश्वास संपादन करुन ब्रिटन मधील एका टोळक्याने महिलेची ७३ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. या फसवणूक प्रकरणी महिलेने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.

दीपिका भोलेशंकर पांडे (२९, रा. क्रेस्टीया कासाबेला गोल्ड, पलावा, डोंबिवली पूर्व) असे तक्रारदार महिलेचे नाव आहे. डॅनियल जोन्स, फ्रॅक विल्सन, जॅक्सन वुन, रियाझ अशी आरोपींची नावे आहेत. हे सर्व ब्रिटन मधील रहिवासी आहेत. नोव्हेंबर २०२१ ते जुलै २०२२ या कालावधीत या टोळक्याने दीपिका पांडे यांच्याशी संपर्क ठेऊन ऑनलाईन व्यवहारातून त्यांची फसवणूक केली आहे.

पोलिसांनी सांगितले, दीपिका पांडे यांच्याशी आरोपी इसमांनी गेल्या वर्षी समाज माध्यमाच्या साहाय्यातून संपर्क ककरण्यास सुरुवात केली. आपण ब्रिटन मधून बोलतो. असे सांगून त्यांनी दीपिका बरोबर संवाद आणि संपर्क वाढविला. दीपिका आणि आरोपी यांचे नियमित व्हाॅट्सप संपर्कातून बोलणे होत होते. या बोलण्यातून आरोपींनी दीपिकाचा विश्वास संपादन केला. दीपिका यांना आम्ही तुम्हाला ब्रिटन मधून आकर्षक भेट वस्तू पाठवितो, असे सांगितले. दीपिकाने त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. आकर्षक भेट वस्तू कुरियरने येणार म्हणून त्या वाट पाहत बसल्या.

हेही वाचा : गिधाड संवर्धनासाठी वन्यजीव प्रेमी सरसावले ; शासनाच्या मदतीने मोहिम, नागरिकांनाही मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन

काही दिवसांनी दीपिकाला रियाझ, डॅनियल, जॅक्सन, फ्रॅक यांनी आलटूपालटून संपर्क करुन आम्ही तुम्हाला महागडी आकर्षक भेट वस्तू पाठविली आहे. पण ही वस्तू सीमा शुल्क विभागाने पकडली आहे. या वस्तुचे सीमा शुल्क भरल्या शिवाय तुम्हाला वस्तू मिळणार नाही असे सांगितले. यासाठी दीपिका यांना त्यांच्या बँक खात्यामधून विविध टप्प्यात एकूण ७३ लाख आठ हजार रुपये रक्कम ‌वळती करण्यास भाग पाडले. पूर्ण रक्कम सीमा शुल्क विभागाकडे भरल्यानंतरच वस्तू ताब्यात मिळणार असे भामट्यांनी दीपिकाला सांगितले होते. या आशेने दीपिकाने पूर्ण रक्कम भरणा केल्यानंतर आता वस्तू आपणास मिळणार या आशेवर राहिल्या.

हेही वाचा : डोंबिवली : नोकरीचे आमिष दाखवून डोंबिवलीत विद्यार्थीनीची फसवणूक

रक्कम भरणा करुनही वस्तू १५ दिवस झाली तरी घरी आली नाही. तसेच नियमित संपर्कात असलेले मित्र आपणास प्रतिसाद देत नाहीत. दीपिकाला उत्तर देण्यास त्यांनी टाळाटाळ सुरुवात केली. आपणाशी संपर्क ठेवणारे हे मित्र नव्हते तर ते भामटे होते, हे उशिरा लक्षात आल्यावर दीपिकाने मानपाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार केली. पोलिसांनी माहिती व तंत्रज्ञान कायद्याने गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.
पलावा वसाहतीमध्ये मध्यवर्गीय रहिवासी अधिक संख्येने असल्याने भामटे त्यांच्याशी जवळीक करुन त्यांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांची फसवणूक करत आहेत. अशा प्रकारच्या अनेक तक्रारी पलावा भागातून मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल आहेत.