ठाण्यातील घोडबंदर सोमवारी सकाळी मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या वाहतूक कोंडीमुळे या मार्गावरून प्रवास करणारे लोक रस्त्यावर अडकून पडले. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री उशिरा गायमुख घाटावर एक ऑईल टँकरने कंटेनर आणि तीन कारला धडक दिली. या घटनेमध्ये तीन जण जखमी झाले आहे. या अपघातानंतर ही वाहतूक कोंडी झाली होती.  

रात्री साडेदहा वाजताच्या आसपास झालेल्या या अपघातामुळे घोडबंदर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आणि सोमवारी सकाळी प्रवासी रस्त्यावर अडकले. दरम्यान, घोडबंदर रोडच्या गुजरात बाउंड लेनवरील वाहतूक अपघातानंतर बंद करण्यात आली होती. पण अनेकांना याबाबत माहिती नसल्याने ते या वाहतूक कोंडीत अडकले. ही वाहतूक कोंडी तब्बल आठ किलोमीटरची होती, अशी माहिती समोर आली आहे. घटनास्थळावरून अपघातग्रस्त वाहनं हटवून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

या अपघातात धडक देणाऱ्या ऑईल टँकरसह इतर चार वाहनांचं नुकसान झालंय. तसेच घटनेत तीन जण जखमी असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. वाहतूक कोंडी हटवून रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलंय.