कल्याण – होळीचा सण कल्याण, डोंबिवली शहरांमध्ये आनंदाने, उत्साहाने साजरा व्हावा. प्रत्येकाने नियमांचे पालन करून, कायद व सुव्यवस्थेला बाधा येणार नाही अशा पध्दतीने साजरा करावा या विचारातून कल्याण, डोंबिवलीतील आठ पोलीस ठाणे हद्दीत ९०० पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा दोन दिवस बंदोबस्त लावण्यात आला आहे, अशी माहिती कल्याण परिमंडळाचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली.
यावेळी प्रथमच महिलांच्या सुरक्षिततेचा विचार करून प्रत्येक पोलीस ठाणे हद्दीत साध्या वेशातील महिला पोलीस रस्त्यावर तैनात असणार आहेत. होळी निमित्त आयोजित सार्वजनिक ठिकाणच्या कार्यक्रमांवर गस्ती पथकातील पोलिसांची नजर असणार आहे. शहरातील मुख्य वर्दळीचे रस्ते, चौकांमध्ये गस्ती पोलीस कायमस्वरुपी तैनात असतील.
होळी सण साजरा होत असताना त्याला कोठेही गालबोट लागू नये, हुल्लडबाजीचे स्वरुप येऊ नये याची काळजी गस्तीवरील पोलीस घेतील. कल्याण परिमंडळातील बंदोबस्तामध्ये ९० पोलीस अधिकारी, ६२५ कर्मचारी, १०० गृहरक्षक जवान, दोन विशेष राखीव पोलीस दलाच्या तुकड्या शहरात तैनात असणार आहेत, अशी माहिती उपायुक्त झेंडे यांनी दिली.
वाहतूक पोलिसांकडून शहरातील मुख्य रस्ते, चौक, उड्डाण पूल भागात बंदोबस्त लावण्यात येणार आहे. या कालावधीत प्रत्येक वाहन चालकाची तपासणी वाहतूक पोलीस करतील. होळी सणाच्या काळात अनेक उत्साही वाहन चालक मद्य सेवन करून दुचाकी, चारचाकी वाहने चालवितात. यामुळे अपघात होण्याची भीती असते. हा विचार करून वाहतूक पोलिसांनी वाहन तपासणी मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. मद्य सेवन करून वाहने चालविणाऱ्यांवर दंडात्मक आणि फौजदारी कारवाई केली जाणार आहे. ही कटु कारवाई टाळण्यासाठी प्रत्येक वाहन चालकाने खबरदारी घ्यावी, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.