scorecardresearch

ठाण्यात निरोगी वृक्षांचे प्रमाण ९९ टक्के, वृक्षगणना अहवालातील निरीक्षण

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरातील वृक्षांची गणना करण्यात आली. त्यासाठी २०१७ ते २०२२ या कालावधीत वृक्षांचे सर्वेक्षण करण्यात आले.

ठाण्यात निरोगी वृक्षांचे प्रमाण ९९ टक्के, वृक्षगणना अहवालातील निरीक्षण

महापालिका क्षेत्रात ७ लाख २२ हजार ४२६ इतके वृक्ष असल्याची बाब वृक्षगणना अहवालातून पुढे आली असून त्यात ७ लाख १५ हजार ८७५ म्हणजेच ९९.९ टक्के वृक्ष निरोगी असल्याचा दावा करण्यात येत आहे. फळ, फुले, औषधी वृक्षांचा समावेश आहे. तसेच शहरातील एकूण झाडांच्या संख्येत देशी झाडांचे प्रमाण ७२ टक्के तर, विदेशी झाडांचे प्रमाण २८ टक्के इतके असल्याचे निरीक्षण अहवालात नोंदविण्यात आले आहे. शहरात देशी हेरीटेज वृक्षांची संख्या ७२९ तर विदेशी हेरीटेज वृक्षांची संख्या १८० इतकी आढळून आली आहे.

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरातील वृक्षांची गणना करण्यात आली. त्यासाठी २०१७ ते २०२२ या कालावधीत वृक्षांचे सर्वेक्षण करण्यात आले. या झाडांचे जिओ टॅगींग करण्यात आले असून त्यात वृक्षाचे नाव, प्रजाती, परिघ, उंची, वय, आरोग्य स्थिती आणि जीपीएस निर्देशांक अशी नोंद करण्यात आली आहे. या सर्वेक्षणात २७१ प्रजातीची ७ लाख २२ हजार ४२६ झाडांची नोंद झाली आहे. शहरात देशी प्रजातीची ५ लाख १७ हजार ८७२ झाडे असून त्याचे प्रमाण ७१.६८ टक्के इतके आहे. तर, विदेशी प्रजातीची २ लाख ४ हजार ५५४ झाडे असून त्याचे प्रमाण २८.३१ टक्के इतके आहे. शहरातील ७ लाख १५ हजार ८७५ वृक्ष निरोगी असून त्याचे प्रमाण ९९.९ टक्के इतके असल्याचा दावाही अहवालात करण्यात आला आहे. त्यात फळ, फुले, औषधी वृक्षांचा समावेश आहे.

देशी वृक्षांमध्ये पांढरा खैर, सप्तपर्णी, नीम, काटेसावर, ताड, पळस, कुंभ, बहावा, सुरू, पांढरा सावर, नारळ, भोकर, पिंपळ, वड, अंजीर, उंबर, कोकम, आवळा, मोह, आंबा, कदंब, असुपालव, करंज, सीताशोक, बिब्बा, जंगली बदाम, जांभूळ, साग, देशी बदाम, भेंडी, बोर, यासारख्या वृक्षांचा समावेश आहे. तर विदेशी वृक्षांमध्ये गोरखचिंच, पर्जन्यवृक्ष, फॅन पाम, कैलाशपती, गुलमोहर, निलगिरी, निलमोहर, गोल्डन रेन ट्री, चेंडूफुल, सोनमोहर, चिंच, अशा वृक्षांचा समावेश आहे. ५० वर्षांपेक्षा जास्त जुनी असलेल्या देशी आणि विदेशी हेरीटेज वृक्षांचे सर्वेक्षण करण्यात आले असून त्यात देशी हेरीटेज वृक्षांची संख्या ७२९ तर विदेशी हेरीटेज वृक्षांची संख्या १८० इतकी आढळून आली आहे. त्यात पिंपळाचे १०० ते ११४ वर्षे जुन्या वृक्षांचा समावेश आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-04-2022 at 17:49 IST
ताज्या बातम्या