scorecardresearch

घराजवळ थुंकत असल्याने १३ वर्षाच्या मुलाची गळा दाबून हत्या: ठाणे पोलीसही चक्रावले

स्वच्छतागृहाच्या पहिल्या मजल्यावर दशरथ याने रुपेशला नेले अन् गळा आवळून खून केला

दिवा येथील नागवाडी भागात घराजवळ थूंकतो म्हणून दशरथ काकडे (२८) याने शेजारी राहणाऱ्या रुपेश गोळे (१३) याचा गळा आवळून खून केल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दशरथ काकडे याला अटक केली आहे.

दिवा पश्चिम येथील नागवाडी भागात रुपेश गोळे हा वडिल विजय आणि आईसोबत राहत होता. त्याच्या शेजारी दशरथ हा राहत असून तो रुपेशचा नातेवाईकही आहे. दिवा येथे सुरू असलेल्या गावदेवीच्या जत्रेला रुपेशला नेतो असे विजय यांना सांगून दशरथ हा रुपेशला रविवारी दुपारी ३.३० वाजता घेऊन गेला होता. सायंकाळी दशरथ घरी परतला होता. परंतु त्याच्यासोबत रुपेश आला नव्हता. त्यामुळे विजय यांनी दशरथला रुपेशबद्दल विचारले असता, त्याने तो जत्रेत खेळत असल्याची माहिती दिली. रात्री उशीरापर्यंत रुपेश घरी आला नव्हता. त्यामुळे विजय यांनी रुपेश बेपत्ता असल्याची तक्रार मुंब्रा पोलीस ठाण्यात दाखल केली होती.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी याप्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करून संशयीत म्हणून दशरथ याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली सुरू केली. त्यावेळी आपण रुपेशला घेऊन गेल्यानंतर त्याला पहिल्यांदा रस्त्याकडेला फेरीवाल्याकडून कपडे खरेदी करून घेऊन दिले आणि त्यानंतर जत्रेत नेले असे सांगून दशरथ हा पोलिसांना उडवा-उडवीची उत्तरे देत होता.

दिव्यात केवळ सांयकाळीच बाजार भरतो. परंतु दशरथने रुपेशला दुपारी नेले होते. त्यामुळे पोलिसांचा संशय आणखी बळावला. सोमवारी सायंकाळी पोलीस त्याला बाजारात घेऊन गेले. तसेच कोणत्या फेरीवाल्याकडून हे कपडे खरेदी केले याबद्दल विचारले. त्यानंतर दशरथ हा एका फेरीवाल्याकडे घेऊन गेला. पोलिसांनी फेरीवाल्याला विचारले असता, दशरथ हा त्याच्याकडे आलाच नसल्याचे फेरीवाल्याने सांगितले. पोलिसांनी दशरथला पुन्हा पोलीस ठाण्यात नेत त्याची सखोल चौकशी केली. त्यावेळी त्याने हत्येची कबूली दिली.

स्वच्छतागृहात मृतदेह

दिवा येथील एका निर्जनस्थळी ठाणे महापालिकेचे एक सार्वजनिक स्वच्छतागृह आहे. या स्वच्छतागृहात कोणीही फिरकत नसते. त्यामुळे स्वच्छतागृहाच्या पहिल्या मजल्यावर दशरथ याने रुपेशला नेले. त्याठिकाणी त्याचा गळा आवळून खून केला. तसेच मृतदेह तिथेच सोडून दशरथ हा घरी आला होता. सोमवारी पोलिसांनी रुपेशचा मृतदेह स्वच्छतागृहातून बाहेर काढला.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A boy murdered over spitting outside home in diva thane sgy

ताज्या बातम्या