scorecardresearch

आधी लुटमार केली मग नग्न करत…; अपरात्री कारचालकासोबत घडला धक्कादायक प्रकार, कल्याणमधील घटना

आरोपींनी गुगल पे, फोन पेच्या माध्यमातून ९० हजार रूपयांची रक्कम आपल्या बँक खात्यात जमा करण्यास भाग पाडलं

कल्याण पूर्वेतील मलंगगड रस्त्यावर एका व्यक्तीला लुटण्यात आल्याची घटना समोर आली आहे. येथील एक रहिवासी कारने रात्रीच्या वेळेत चालला होता. दोन जणांनी त्यांची कार अडवली आणि जबरदस्तीने आत घुसले. त्यांनी कार चालकाला चाकूचा धाक दाखवून, जीवे ठार मारण्याची धमकी देऊन वाहन मलंगगड जंगलाच्या दिशेने नेण्यास सांगितले. जंगलात कार चालकाजवळील रोख रक्कम, सोन्याचा असा एकूण एक लाख ५० हजार रूपयांचा ऐवज लुटारूंनी लुटून पलायन केले.

कार चालकाजवळ मोठी रक्कम नव्हती. लुटारूंनी त्यांना गुगल पे, फोनपेच्या माध्यमातून ९० हजार रूपयांची रक्कम आपल्या बँक खात्यात जमा करण्यास भाग पाडले. चालकाच्या गळ्यातील ४० हजार रूपये किमतीची रक्कम लुटारूंनी काढून घेतली. चालकाला विवस्त्र करून त्याचा व्हिडीओ तयार केला. पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार केली तर हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करून बदनामीची धमकी चालकाला दिली. लुटारू जीवे ठार मारतील या भीतीने चालकाने प्रतिवाद केला नाही. लुटून झाल्यानंतर दोन्ही लुटारू घटनास्थळावरून पळून गेले.

प्रथमेश वांगुर्ले, विश्वकर्मा अशी आरोपींची नावे आहेत. मंगळवारी रात्री नऊ वाजता पीडित आपल्या इंडिगा वाहनाने कल्याण पूर्वेतून मलंगगड रस्त्याने एकटेच चालले होते. नांदिवली तर्फ गावाजवळून जात असताना, अचानक रस्त्यावर उभे असलेल्या दोन जणांनी त्यांची कार अडवली. त्यांनी वाहन थांबवलं. त्याचा गैरफायदा घेत लुटारू जबरदस्तीने कारमध्ये घुसून त्यांना काही कळण्याच्या आत मारहाण सुरू केली. चॉपरचा धाक दाखवून त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

आपण सांगू त्या दिशेने कारला नेण्यास सांगितले. मलंगगड जवळील ढोके गावाजवळील जंगल भागात लुटारूंनी कार थांबवून सोन्याचा ऐवज, गुगल पे, फोन पे ऑनलाइन माध्यमातून पैसे काढून घेतले. जंगल भागात, वाहनात एकटाच असल्याने पीडित व्यक्तीने लुटारूंना प्रतिवाद केला नाही. ऑनलाईन माध्यमातून लुटारूंनी पैसे घेतल्याने त्यांची नावे कळली.

पीडित कार घेऊन रात्रीच कोळसेवाडी पोलीस ठाण्यात आले. त्यांनी घडल्या घटनेची तक्रार केली. त्याआधारे पोलिसांनी अपहरण, लुटमार, शस्त्राचा अवैध वापर कायद्याने गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्क पोलीस निरीक्षक एच. एस. बोचरे तपास करत आहेत. दोन्ही आरोपी फरारी आहेत.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A car driver looted in kalyan sgy

ताज्या बातम्या