कल्याण - मागील महिनाभर कल्याण मधील एका २४ वर्षीय नोकरदार तरूणीचा पाठलाग करून, तू माझ्यावर प्रेम कर. तू माझ्यावरील प्रेमाला नकार दिला तर मी तुला मारून टाकीन, अशी धमकी देणाऱ्या, तसेच या तरूणीचा विनयभंग करणाऱ्या मोहसिन शेख (२४) या तरूणाविरूध्द पीडित तरूणीच्या तक्रारीवरून खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पीडित तरूणी कल्याण पश्चिमेत राहते. त्याच भागातील एका व्यापारी संकुलात ती नोकरी करते. आरोपी मोहसिन शेख हा कल्याण मधील सिंधीगेट भागात राहतो. नाॅन फूड व्हर्टेक्स व्हाॅट्सप ग्रुपमधून प्राप्त झालेल्या मोबाईल क्रमांकावरून पीडित तरूणी आणि आरोपी तरूण मोहसिन यांची ओळख झाली होती. गेल्या महिनाभर आरोपी मोहसिन पीडितेचा पाठलाग करून तिला प्रेमाची गळ घालत होता. पण पीडिता त्याला दात देत नव्हती. हेही वाचा >>>मुसळधार पावसात कल्याणमधील आधारवाडी, गांधारे रोड परिसरात तीव्र पाणी टंचाई; महागड्या टँकरच्या पाण्यावर रहिवासी अवलंबून पोलिसांनी सांगितले, आरोपी तरूण मोहसिन आणि पीडित तरूणी यांची व्हाॅट्सप ग्रुपच्या माध्यमातून ओळख झाली होती. या परिचयातून मोहसिन याने पीडितेचा विश्वास संपादन केला होता. तो तिला माझे तुझ्यावर प्रेम आहे. मी तुला दररोज तुझ्या घरी माझ्या दुचाकीने सोडत जाईन. आपण बाहेर फिरायला जाऊ. तू जर माझ्या बरोबर आली नाहीस, माझ्यावर प्रेम केले नाहीस तर मी तुला मारून टाकीन, अशी धमकी आरोपी देत होता. पीडिता घरातून आपल्या कामाच्या ठिकाणी आणि कामावरून घरी जाण्यास निघाली की आरोपी तिचा पाठलाग करायचा. तिला फिरण्यासाठी येण्याचा आग्रह करायचा. असाच एकदा पाठलाग करत असताना आरोपीने पीडितेला थांबवून तिचा हात पकडून तिचा विनयभंग केला, असे पोलिसांनी सांगितले. हेही वाचा >>>मुंबई-गोवा महामार्गावरून रवींद्र चव्हाण- श्रीकांत शिंदे यांच्या समर्थकांमध्ये जुंपली; विधानसभेपूर्वी चव्हाण यांना घेरण्याची शिवसेनेची रणनिती महिनाभर सुरू असलेल्या या प्रकाराने पीडित तरूणी त्रस्त होती. तिने घडला प्रकार घरी सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांच्या पुढाकाराने या पीडितेने खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक डाॅ. ए. आर. वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पी. बी. साबळे तपास करत आहेत. आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी काही महिला संघटनांनी केली आहे.