A case has been registered against labor leader Rajan Raje thane news ysh 95 | Loksatta

ठाणे: कामगार नेते राजन राजे यांच्याविरोधात गुन्हा दाखल

बांधलेल्या विहिरीतून राजन राजे यांनी त्यांच्या मालकीच्या शेती आणि शेतघराकरिता पाणी वापरल्याने त्यांचा या गुन्ह्यात सहभाग असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

rajan raje
लोकसत्ता ग्राफिक्स टीम

ठाणे: मुरबाड तालुक्यातील सायले येथील डोईफोडी नदीपात्रात बेकायदेशीरपणे विहीर बांधकाम केल्याप्रकरणी तलाठी संतोष पवार यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे कामगार नेते आणि धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांचा मुलगा ऋग्वेद यांच्याविरोधात टोकावडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यापाठोपाठ आता याचप्रकरणात राजन राजे यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बांधलेल्या विहिरीतून राजन राजे यांनी त्यांच्या मालकीच्या शेती आणि शेतघराकरिता पाणी वापरल्याने त्यांचा या गुन्ह्यात सहभाग असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

तलाठी यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, येथील डोईफोडी नदीपात्रात शासनाच्या कोणत्याही विभागाची परवानगी न घेता ऋग्वेद राजन राजे यांनी विहिरीचे बांधकाम केल्याची तक्रार ग्रामपंचायत सायले आणि साजगाव येथील ग्रामस्थ, शेतकऱ्यांनी केली होती. या तक्रारीची दखल घेऊन मुरबाडच्या तहसिलदारांनी या ठिकाणी पाहाणी करून चौकशी केली. त्यावेळी नदीपात्रात बेकायदेशीररित्या  ३० फुट खोल व २५ फूट व्यासाच्या विहीरीचे बांधकाम झाल्याची बाब आढळून आले. त्यानुसार टोकावडे पोलीस ठाण्यात ऋवेद राजे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.

हेही वाचा >>> प्रक्रिया न केलेल्या सोन्याच्या मोहाला सराफ बळी; भामट्याने सराफाला लुटले

या बांधलेल्या विहिरीतून राजन राजे यांनी त्यांच्या मालकीच्या शेती आणि शेतघराकरिता पाणी वापरल्या प्रकरणी शुक्रवारी राजन राजे यांच्याविरुद्ध तलाठी पवार यांनी टोकावडे पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे,असे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. राजन राजे हे ठाण्यातील कामगार नेते असून ते धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष आहेत. ठाणे जिल्ह्यातील विविध कंपन्यांत त्यांची कामगार संघटना अस्तित्त्वात आहे. शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर राजन राजे यांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला होता. तसेच ठाण्यातील ठाकरे गटाच्या काही कार्यक्रमांनाही त्यांची उपस्थिती होती.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-11-2022 at 15:01 IST
Next Story
डोंबिवलीतील १५ बेकायदा इमारतींची ‘रेरा’ नोंदणी ‘महारेरा’कडून रद्द; करोना काळात बँकाँकडून माफियांना सर्वाधिक कर्ज