कल्याण येथील पश्चिमेतील कासारहाट भागातील एका ५० फूट खोल कठडा नसलेल्या जुन्या विहिरीच्या काठी आज सकाळी दोन मांजरींचे चढाओढीचे भांडण झाले. या भांडणात एक मांजर विहिरीत पडली. विहिरीतील पाण्यामुळे गांगरलेल्या मांजरीने बचावासाठी म्याव म्याव ओरडा सुरू केला. परिसरातील नागरिकांनी मांजरीच्या बचावासाठी प्रयत्न केले. ते निष्फळ ठरल्यानंतर कल्याण डोंबिवली पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी मांजरीचे आवडते खाद्य दोरीला बांधून त्या साहाय्याने तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर तिची विहिरीतून सुटका केली. हा प्रकार पाहण्यासाठी कासारहाट भागातील नागरिक मोठ्या संख्येने विहिरीकाठी जमले होते. कासारहाट भागात विठ्ठल मंदिरा जवळ जुन्या काळातील कठडा नसलेली एक विहीर आहे. या विहिरीच्या काठी आज सकाळी दोन मांजरींमध्ये जोराचे भांडण (खाजट) झाले. या चढाओढीत एक मांजर विहिरीत पडली. पाण्यात पोहत म्याव म्याव करत मांजरीने बचावासाठी ओरडा सुरू केला. परिसरातील व्यापारी, रहिवासी मांजरीला बाहेर काढण्यासाठी जमा झाले. सुरूवातीला रहिवाशांनी काठी, दोरी, पाळणा टाकून मांजरीला वर काढण्याचे प्रयत्न केले. त्याला यश आले नाही. पोहून दमलेली मांजर विहिरीतील एका कपारीत जाऊन बसली. हेही वाचा >>>ठाणे जिल्ह्यात बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे बेकायदा बांधकामांची उभारणी पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना घटनास्थळी बोलविण्यात आले. दलाचे पथकप्रमुख सनी भगरे यांच्यासह जवान सनी पारधी, हेमंत आसकर, आकीब तिरंदाज, निखील जाधव, जय पाटील यांनी त्यांच्या जवळील शिडी, दोर, पाळणे साधने वापरून मांजरीला बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागले. कपारीत बसलेली मांजर बाहेर येण्यास तयार नव्हती. तीन तास हे प्रयत्न सुरू होते. एका नागरिकाने दोरीला तिचे आवडते खाद्य माशाचे तुकडे बांधून ते विहिरीतील पाळण्यात सोडा म्हणजे त्या वासाने मांजर पाळण्यात येईल, अशी सूचना जवानांना केली. तात्काळ माशाचे तुकडे आणून ते दोरीला बांधून अग्निशमन जवानांनी विहिरीत सोडलेल्या पाळण्यात सोडले. पाळणा मांजर लपून बसलेल्या कपारीच्या दिशेने हलविण्यात आला. माशाचा वास येताच तीन तास कपारीत बसलेली मांजर टुणकन उडी मारुन मासे खाण्यासाठी पाळण्यात आली. तात्काळ जवानांनी पाळणा वर खेचून मांजूर पुन्हा विहिरीत उडी मारणार नाही याची काळजी घेत वर खेचला. मांजरीला सुखरुप बाहेर काढली. जमिनीवर पाळणा ठेवताच मांजरीने म्याव म्याव करत आपल्या मूळ निवासस्थानी गर्दीतून धाव घेतली.