scorecardresearch

ठाणे : अमली पदार्थांचा कारखाना सुरू करण्याचा कट उद्ध्वस्त

रत्नागिरी येथील लोटे औद्योगिक क्षेत्रात एमडी हा अमली पदार्थ तयार करण्याचा कारखाना सुरू करण्याचा कट ठाणे पोलिसांनी उद्ध्वस्त केला आहे.

conspiracy to start a drug factory
अमली पदार्थांचा कारखाना सुरू करण्याचा कट उद्ध्वस्त (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

ठाणे : रत्नागिरी येथील लोटे औद्योगिक क्षेत्रात एमडी हा अमली पदार्थ तयार करण्याचा कारखाना सुरू करण्याचा कट ठाणे पोलिसांनी उद्ध्वस्त केला आहे. याप्रकरणात पोलिसांनी अभिषेक कुंतल या मुख्य आरोपीसह सातजणांना अटक केली आहे. सुमारे आठ महिन्यांपूर्वी महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) विभागाला हरियाणा येथे अमली पदार्थ तयार करण्याचा कारखाना आढळून आला होता. या प्रकराणातही अभिषेक कुंतल हा फरार होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

जितेंद्र चव्हाण (३३), सचिन चव्हाण (३८), दिनेश कोडमूर (३७), सल्लाउद्दीन शेख (४१), अभिषेक कुंतल (५४), नफीस पठाण (३३) आणि मुब्बशीर माटवणकर (३८) अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत. ठाणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने सुमारे दीड महिन्यांपूर्वी अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या जितेंद्र आणि सचिन या दोघांना ताब्यात घेऊन अटक केली होती. त्यांच्याकडे पोलिसांनी ६३ ग्रॅम एमडी आढळले होते. त्यांची चौकशी केली असता त्यांनी हे अमली पदार्थ दिनेश कोडमूर याच्याकडून विकत घेतल्याचे समोर आले. त्याला पोलिसांनी दिघा येथून अटक केली. त्याच्याकडे ५४ ग्रॅम अमली पदार्थ जप्त आढळले. त्याने हे अमली पदार्थ सलाउद्दीन शेख याच्याकडून घेतल्याचे समोर आले.

हेही वाचा – सामान्य ठाणेकरांसाठी लोककेंद्रित प्रकल्पांची गुढी; महापालिकेच्या अर्थसंकल्पात आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर भर

सदाउद्दीन हा अभिषेकच्या माध्यमातून एमडी घेत होता. त्यामुळे पोलिसांनी सलाउद्दीन आणि अभिषेक याला ताब्यात घेऊन अटक केली.
पोलिसांनी त्याची चौकशी केली असता, त्याने काही साथिदारांच्या माध्यमातून खेड येथील लोटे एमआयडीसी भागात अमली पदार्थ तयार करण्याचा कट रचला होता. पोलिसांनी त्याला अटक केल्याने हा कट उद्ध्वस्त झाला. अभिषेक याच्या अटकेनंतर पोलिसांनी नफीस आणि मुब्बशीर या दोघांनाही अटक केली. याप्रकरणात पोलिसांनी एकूण १४ लाख १८ हजार रुपये किमतीचा मुद्दा जप्त कला आहे.

हेही वाचा – ठाण्याच्या वाहतूक व्यवस्थेची जबाबदारी एमएमआरडीएच्या खांद्यावर

अभिषेक याचे माहिती तंत्रज्ञान या विषयात शिक्षण पूर्ण झाले आहे. पोलिसांनी त्याच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण केले असता, तो हरियाणा, उत्तरप्रदेश आणि हैदराबाद येथील काही अमली पदार्थ तस्करांच्या संपर्कात असल्याचे आढळून आले. २०२२ मध्ये हरियाणा येथे अमली पदार्थ बनविण्याचा कारखाना तयार करण्यात आला होता. त्यावेळी महसूल गुप्तचर संचनालयने (डीआरआय) हा कारखाना उद्ध्वस्त केला होता. तेथे विभागाने १३३ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले होते. याप्रकरणात अभिषेक हा फरार होता.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-03-2023 at 23:13 IST

संबंधित बातम्या