scorecardresearch

भिवंडी जवळील टाटा आमंत्रा करोना केंद्रातून पळालेला मोक्कातील गुन्हेगार दोन वर्षांनी अटक

कल्याण जवळील आंबिवली मधील इराणी वस्तीतील एक सराईत चोरटा मोक्का कायद्याने न्यायालयीन कोठडीत होता.

भिवंडी जवळील टाटा आमंत्रा करोना केंद्रातून पळालेला मोक्कातील गुन्हेगार दोन वर्षांनी अटक
भिवंडी जवळील टाटा आमंत्रा करोना केंद्रातून पळालेला मोक्कातील गुन्हेगार दोन वर्षांनी अटक

कल्याण जवळील आंबिवली मधील इराणी वस्तीतील एक सराईत चोरटा मोक्का कायद्याने न्यायालयीन कोठडीत होता. त्याला दोन वर्षापूर्वी करोना महासाथीच्या काळात करोनाची लागण झाल्याने कल्याण डोंबिवली पालिके्च्या भिवंडी जवळील टाटा आमंत्रा करोना काळजी केंद्रात उपचारासाठी ठेवले होते. या काळात पोलिस, डाॅक्टरांना चकवा देऊन चोरट्याने करोना केंद्रातून पलायन केले होते. दोन वर्षानंतर कल्याण मधील खडकपाडा पोलिसांनी या चोरटयाला सोमवारी मोहने येथील लहुजीनगर भागातून अटक केली.

हेही वाचा >>>कल्याण मध्ये मैत्रिणीच्या वादातून अल्पवयीन तरुणाला बेदम मारहाण

सराईत चोरटा हा दुचाकी चोर आहे. त्याने ठाणे जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवली, भिवंडी, मुंबई परिसरात दुचाकी, सोन्याचा ऐवज लुट, चोरीचे १५ गुन्हे केले आहेत. गाझी दारा इराणी उर्फ जाफरी उर्फ सय्यद (२७, रा. इराणी वस्ती, आंबिवली) असे आरोपीचे नाव आहे.पोलिसांनी सांगितले, गेल्या आठवड्यात खडकपाडा भागातून एक दुचाकी चोरीला गेली होती. खडकपाडा पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड या प्रकरणाचा तपास करत होते. या तपासात गायकवाड यांना दुचाकी चोरणारा एक चोरटा मोहने येथील लहुजीनगर भागात येणार आहे अशी माहिती मिळाली. गायकवाड यांच्या तपास पथकाने मोहने भागात सापळा लावला. ठरल्या वेळेत इसम मोहने भागात आला. त्याच्या संशयास्पद हालचालीवरुन गुप्त माहितगाराने हाच तो चोरटा असल्याचा इशारा पोलिसांना दिला. पथकाने त्याच्यावर झडप घालून ताब्यात घेतले. गाझी इराणी असे आपले नाव असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

हेही वाचा >>>रिकॅलिब्रेशनसाठी मुदतवाढ देण्याची रिक्षा महासंघाची कल्याण ‘आरटीओ’कडे मागणी

निरीक्षक गायकवाड यांनी त्याची कसून चौकशी केली. त्याने आपण ठाणे, मुंबई परिसरातील विविध पोलीस ठाणे हद्दीत १५ दुचाकी, जबरी चोरीचे गुन्हे केले आहेत अशी कबुली दिली.दोन वर्षापूर्वी करोना महासाथीत न्यायालयीन कोठडीत असताना करोना झाला म्हणून गाझीला टाटा आमंत्रा करोना केंद्रात ठेवण्यात आले होते. तेथून तो रुग्ण खोलीच्या पाठीमागील खिडकीतून पाईपवरुन उतरुन पळून गेला होता. या प्रकरणात एक पोलीस निलंबित झाला होता. करोनाचा रुग्ण पळून गेल्याने त्यावेळी खळबळ उडाली होती. पोलीस त्याच्या मागावर होते. तो पोलिसांना चकवा देत होता. गाझीकडून चोरीच्या तीन दुचाकी हस्तगत केल्या आहेत. इतर दुचाकींचा तपास सुरू पोलिसांनी सुरू केला आहे.

पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, साहाय्यक आयुक्त उमेश माने पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, पोलीस निरीक्षक शरद झिने, नंदकुमार केवे, साहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड, साहाय्यक उपनिरीक्षक जितेंद्र ठोके, हवालदार अशोक पवार, राजू लोखंडे, मनोहर भोईर, योगेश बुधकर, सुधीर पाटील यांच्या पथकाने गाझीच्या अटकेची कारवाई केली.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-01-2023 at 14:34 IST

संबंधित बातम्या